गुढीपाडवा हा हिंदूचा वर्षारंभाचा प्रथम दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होय. पुराणांमध्ये सांगितले जाते की, ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी ई. गोष्टी प्रामुख्याने केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्या पासूनच रामनवमी उत्सवाला प्रारंभ करतात.
सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. एका बांबूच्या टोकाला तांबडे वस्त्र, साखरेची गाठी, आंब्याची व कडुनिंबाची पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवून हार अर्पण केल्या जातो. घराच्या दरवाज्यांना आंब्याच्या पानांची तोरणे बांधली जातात. सुंदर रांगोळी काढली जाते.
आरोग्याचे दृष्टीने सांगायचे झाले तर, या दिवशी कडुनिंबाची कोवळी कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही काहीतरी शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग, मध मिसळून हा प्रसाद तयार करुन वाटतात. तसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ इत्यादी मिसळून चटणी तयार केली जाते. त्याचे भक्षण केल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात. शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. म्हणून केवळ या दिवशी कडुनिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहे.
कडुनिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोडाची आंतरसाल अशा पाच अंगाचा उपयोग होतो. पाने कडु लागतं असली तरी आपल्या गुणांमुळे गुढीपाडव्याचे दिवशी याचे सेवन केले जाते. शरीरातील उष्णता, हाडीताप कडुनिंबाचे सेवनाने बरा होण्यास मदत होते. उन्हाळ्याचे दिवसात कडुनिंबाची आंतरसाल किंवा कडुनिंबाच्या पानाचा रस काढून पितात. त्वचेसंबधी कोणतीही बिमारी, अंगावर उठणारी खाज कडुनिंबाचे पाने पाण्यात टाकून शिजवून आंघोळ करतात. आपणांस वर्षभर कडुनिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्या पासून दोन महिने तरी कडुनिंबाचे सेवन जरुर करावे. त्याचा वर्षभर लाभ होतो. खरोखरच आरोग्याचे दृष्टीने विचार केला तर कडुनिंबाचे सेवन करणे योग्यच आहे. यामुळे रोगराई दूर पळून जाते आणि शरीर निरोगी राहते. कडुनिंबाचे पानाचा रस घ्यावा म्हणजे ताप कमी होतो. हा आरोग्याचा सल्ला सर्वांनी मानून गुढीपाडव्यापासून कडुनिंबाचे सेवन करु या.
उभारुन आंब्याची गुढी घरी ।
जीवनात येवो रंगत न्यारी ।
पूर्ण होवोत आपल्या,
सर्व इच्छा - आकांक्षा ।
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....