वाशिम : ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल, त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कृषी विभाग आणि विमा कंपनीने वेळीच सर्व्हेक्षण करावे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपनीने करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.
नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेत पिकाची नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी आयोजित संयुक्त समितीच्या सभेत श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या वाशिम येथील संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते, तालुका कृषी अधिकारी सर्वश्री अनिल कंकाळ (वाशिम), आर.एस. इंगोले (मंगरुळपीर), रविंद्र जटाळे (कारंजा), किरण बोथीकर (मालेगांव), उमेश राठोड (मानोरा), व्ही.पी. वाघ (रिसोड), समितीचे सदस्य शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी राधेश्याम मंत्री, सुनिल पाटील, सुरेश सानप, श्री. देशमुख व घुगे यांची सभेला उपस्थिती होती. श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रार करुनसुध्दा त्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीने दिलेली नाही, त्यांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याचे काम विमा कंपनीने तातडीने करावे. विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करु नये. आत्महत्या केलेल्या किती शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. त्यांना पिक नुकसान भरपाई देण्याचे काम विमा कंपनीने जबाबदारी करावे. सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडले गेले आहे याची खात्री कृषी विभागाने करावी. कोणत्याही शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकविना राहणार नाही यासाठी संबंधित शेतकऱ्याला कृषी विभागाने सहकार्य करावे. आधार क्रमांकाशी शेतकऱ्यांचे बँक खाते जोडले गेल्यास त्यांना विविध योजनांचे अनुदान व नुकसान भरपाई मिळण्यास अडचण जाणार नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे कुठे कुठे नुकसान झाले आहे हे कृषी विभागाने बघावे. त्याआधारे नुकसान भरपाई देण्याबाबत कृषी विभागाने विमा कंपनीला कळवावे.
शहा यावेळी म्हणाले, पिक नुकसानीचा अंदाज ठरविण्याचा अधिकार हा कृषी विभागाचा आहे. 4 आठवडयात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या कळया व फुले गळून पडली आहे. त्यामुळे यावर्षी 50 टक्यांपेक्षा कमी उत्पन्न होणार असल्याचा समितीचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.