भारतीय लोकशाहीत राजकारण म्हणजे समाजसेवेचं एक शस्त्र असावं, लोककल्याणाची एक दिशा असावी असं अपेक्षित होतं. पण आजच्या काळात ते एक प्रकारचं “सत्तेचं दुकान” बनलं आहे. सत्ताधारी कुठलेही असोत त्यांच्यासमोर लोटांगण घालून, आपली विचारधारा विसरून, जनतेशी केलेली वचने पायदळी तुडवून, ‘कोणत्याही’ गाडीत बसण्याची तयारी ठेवणारे दलबदलू नेते आपल्या राज्याच्या राजकीय वास्तवात दुर्दैवाने वाढतच आहेत.जनता फसते, निराश होते, पण पुन्हा-पुन्हा विश्वास ठेवते. प्रत्येक निवडणुकीत तिला वाटतं की, कदाचित या वेळेस आपल्याला खरा नेता मिळेल. पण निवडणुकीनंतर ‘दलबदलाची लगबग’ पाहून तीच जनता हादरून जाते.
पण ह्या सगळ्या गोंधळात, स्वार्थी व्यवहारात आणि तत्त्वहीन राजकारणाच्या दलदलीतही एखादा माणूस आपल्या शब्दाशी, आपल्या तत्त्वाशी, आणि आपल्या समाजाशी ठाम उभा राहिला, तर त्याचं रूपांतर थेट लोकनायकात होतं. आज महाराष्ट्रात त्या रूपात एकच नाव लोकांच्या ओठांवर आहे – मनोज पाटील जरांगे.
आंदोलनाचं अनोखं स्वरूप
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या जमिनीत एक वेगळीच चळवळ पेटलेली आहे. ही चळवळ ना पैशाने चालते, ना पदाच्या मोहाने. या आंदोलनात जी गर्दी जमली आहे ती रोजंदारीवर आलेली गर्दी नाही.राजकीय सभांना गर्दी जमवण्यासाठी नेते लोकांना दारू-मटन देतात, बसांची व्यवस्था करतात, हातावर पैसे ठेवतात. पण जरांगेंच्या आंदोलनाला आलेली जनता ही “चटणी-भाकर खाऊन, स्वतःच्या खर्चाने” आलेली आहे. हाच आंदोलनाचा आत्मा आहे.
एका किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी जेव्हा पाच तास लागतात, मुंबई संपूर्ण इकडे आंदोलकात दिसतात तेव्हा कळतं की हा लोकसागर केवळ जमाव नाही तर तो लोकांच्या हृदयातून उगम पावलेला एक प्रवाह आहे.
निवडणुकीतील समीकरणे आणि लोकांचा विश्वास
निवडणुकीच्या वेळी अनेक जणांनी ‘जरांगे फॅक्टर चालला नाही’ अशी चर्चा केली होती. कारण मतदारांनी आपल्या मनाप्रमाणे मतदान केलं. पण त्याच मतदारांच्या मनात जरांगे कायम राहिले.राजकारणात मतदार मनाला जपतो, आणि आंदोलनात हृदयाला. जरांगेंच्या आंदोलनाला जी जनसमर्थनाची लाट मिळाली आहे ती हेच दाखवते की, लोक हृदयातून अजूनही जरांगेंसोबत आहेत.
“मी फुटत नाही, मी मॅनेज होत नाही”
जरांगेंनी दिलेलं एक वाक्य आज लोकांच्या तोंडून तोंडाला जातंय –
“मी फुटत नाही, मी मॅनेज होत नाही.”
या वाक्यात त्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा सार आहे. पैसा, सत्ता, पद यांचं मोहजाल असंख्य नेत्यांना फसवत आलं आहे. कोट्यवधींच्या ऑफर आल्या तरी जरांगे मॅनेज झाले नाहीत. लोक ह्याच गुणासाठी त्यांना “देवमाणूस” म्हणतात.
हे वाक्य म्हणजेच दलबदलू नेत्यांसाठी आरसा आहे. कारण त्यांचं संपूर्ण आयुष्यच ‘फुटणं’ आणि ‘मॅनेज होणं’ यावर आधारलेलं आहे.
जनतेचा जीव ओवाळून टाकणारा विश्वास
गेल्यावर्षी अंतरवाली सराटीत जेव्हा आंदोलन सुरू होतं, तेव्हा एका रात्री अशी अफवा पसरली की जरांगेंना पोलीस ताब्यात घेतील. थोड्याच वेळात शेकडो तरुण हातात दांडके घेऊन गावात दाखल झाले. घोषणांचा गजर झाला –
“जरांगेंच्या जीवावर कुणी हात घालायचा नाही.”
हा विश्वास पैसा देऊन विकत घेता येत नाही. तो मिळतो आपल्या त्यागातून, उपोषणातून, निस्वार्थी संघर्षातून.
कुणबी प्रमाणपत्र आणि आशेची पहाट
आज मराठा घराघरात जरांगेंचे फोटो लावलेले दिसतात. त्याचं कारण म्हणजे लाखो कुटुंबांच्या लेकरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. कुणी पोलीस दलात दाखल झालं, कुणी महावितरणमध्ये नोकरीला लागलं, कुणी एमबीबीएसमध्ये दाखल झालं.
ज्यांचं उच्चशिक्षण महागड्या फीमुळे थांबलं होतं, त्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली. घराघरात आनंद उगवला. म्हणूनच मराठा समाज म्हणतो –
“आरक्षण हे आमचं स्वप्न नव्हे, तर आमचं भविष्य आहे. आणि हे भविष्य जरांगेने दिलं.”
मराठा समाजाला हवे होते असंच नेतृत्व
दशके-दशकं मराठा समाजाने अनेक नेते पाहिले. कुणी राजकारणात मोठे सम्राट झाले, कुणी उद्योगपती बनले. पण समाज मात्र मागेच राहिला. सत्तेत जाऊन समाजाचा प्रश्न सोडवण्याऐवजी बहुतेक नेत्यांनी आपली पिढी गब्बर बनवली.
म्हणूनच मराठा समाजाला हवा होता असा माणूस – जो विकला जाणार नाही, जो झुकणार नाही.
तो माणूस म्हणजे मनोज पाटील जरांगे.
तत्त्वनिष्ठ नेतृत्वाची ताकद
जरांगेंच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कायदेपंडित आणले, पोलिसांचा वापर केला, दबाव टाकला. पण काहीही करून ते यशस्वी झाले नाहीत. कारण जरांगे यांच्या ओठात केवळ एकच भाषा आहे –
“मराठा लेकरांच्या उज्ज्वल भविष्याची भाषा.”
त्यांचा अभ्यास, त्यांची तयारी, त्यांची दृष्टी यामुळे न्यायाधीश असोत किंवा पत्रकार – सगळेच थक्क झाले. त्यांनी दाखवून दिलं की आंदोलन म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही; आंदोलन म्हणजे अभ्यास, तळमळ आणि शिस्त.
आंदोलनाचा नवा चेहरा – सोशल मीडिया
जरांगेंच्या आंदोलनाला माध्यमांची गरज भासली नाही. गावागावात व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले. कोण कुठे थांबणार, कोणत्या गाडीनं जाणार, कुठल्या दिवशी परतणार—सगळं नियोजन त्या ग्रुपवर होतं.
शिस्तबद्धपणे, स्वयंस्फूर्तीने चालणारं हे आंदोलन महाराष्ट्रातील आंदोलनांच्या इतिहासात अद्वितीय आहे.
अफवा, चर्चा आणि जनविश्वास
माध्यमं सतत विचारतात – जरांगेंच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो?
काहींचं म्हणणं – या आंदोलनामुळे समाजात फूट पडते का?
तर काही जण प्रश्न करतात – जरांगे कुणाबद्दल सॉफ्ट आहेत, कुणाबद्दल कठोर आहेत?
पण ह्या प्रश्नांपलीकडे एक गोष्ट सगळ्यांना दिसते –
लोक स्वतःहून आंदोलनाला येतात.राजकारण्यांना लोकांना आणावं लागतं, पैशाने जमवावं लागतं. पण जरांगेंच्या आंदोलनात लोक स्वतःच येतात. हाच त्यांचा विजय आहे.
जरांगेंचं लोकांवरचं प्रेम
गावोगावी आज एकच वाक्य ऐकू येतं –
“पाटील जसं म्हणतील तसं.”
ही लोकांच्या मनातली निष्ठा आहे. महात्मा गांधींनंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर असा लोकसंग्रह महाराष्ट्राने पाहिला नव्हता. पण आज मराठा समाज म्हणतो – “मनोज पाटील जरांगे हेच आमचे तारणहार आहेत.”
दलबदलूंनी घ्यावा धडा
आज दलबदलू नेत्यांनी जरांगेंकडे डोळे उघडून पाहावं.
कारण पैसा, पद, सत्ता यावर टिकणारी राजकारणाची दुनिया किती उथळ आहे, हे जरांगेंनी दाखवून दिलं.
त्यांचं नेतृत्व हे न विकलं जाणारं, न फुटणारं, न झुकणारं आहे.
दलबदलू नेत्यांनी जरांगेंच्या तत्त्वनिष्ठतेतून शिकावं – कारण जनतेचा विश्वास पैशानं विकत घेता येत नाही.
निष्कर्ष
जरांगे हे फक्त एक आंदोलनकर्ते नाहीत, तर एक जनआंदोलनाचे प्रतीक आहेत.
ते मराठा समाजाच्या वेदनेचं, आकांक्षेचं आणि स्वाभिमानाचं मूर्त रूप आहेत.
आज दलबदलू नेत्यांनी जरांगेंकडे पाहावं आणि स्वतःला आरशात पाहावं.
कारण जेव्हा जनता ठरवते, तेव्हा ती पैशाने विकत घेतलेले लोक नाही, तर हृदयाशी नाळ जोडणाऱ्या नेत्यामागे उभी राहते.महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर इतका मोठा लोकसंग्रह कमावणारा एकमेव माणूस म्हणजे मनोज पाटील जरांगे.
ते फक्त नेता नाहीत—ते जनतेच्या श्वासात, रक्तवाहिन्यांत, आणि भविष्यात जगणारे लोकनायक आहेत.
✍️ लेखक .....
गजानन कुसुम ओंकार हरणे. (मराठा योद्धा)
जिल्हा परिषद नगर,
खडकी अकोला
संवाद..9822942623.
आपल्या प्रतिक्रिया द्या....