स्थानिक इंदिरा नगर येथील आम आदमी पार्टीचे युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे यांचे ४० वर्षिय बंधू पुरुषोत्तम बोपचे यांचेवर वाघाने हल्ला केला त्या घटनेत ते मृत्यूमुखी पडले. सदरहु घटना चंद्रपूर- - मुल मार्गावरील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या लोहराच्या जंगलात घडली. दरम्यान उपरोक्त घटना शुक्रवार दि. 28/4/2023ला सकाळी ९. ३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. इंदिरा नगर येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम हे स्थानिक एम. ई. एल. (पोलाद कारखान्यात ) मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी पुरुषोत्तम हे लोहारा जंगलात फुले वेचण्यासाठी गेले होते. दुपार झाली तरी ते घरी परत आले नव्हते. म्हणून त्यांच्या पत्नीने घरा शेजारच्या लोकांना घेऊन त्यांचा शोध घेतला. शोध घेत असतानाच जंगलात येऊन बघितले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या घटनेमुळे आप परिवारात शोककळा पसरली असून त्यांचे तर्फे स्व. पुरुषोत्तम बोपचे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे.