चालू आठवड्यातील पावसामुळे पश्चिम विदर्भातील पिकांना नवसंजीवनी.
वाशिम : पश्चिम विदर्भातील शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची प्रतिक्षा करीत असतांनाच, बंगालच्या उपसागरापासून-अरबी समुद्रा पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मोसमी वाऱ्यांनी वेग धरल्यामुळे सोमवार दि.२१ जुलै २०२५ पासून,अख्ख्या महाराष्ट्रासह पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाडा-विदर्भात आणि वाशिम,अकोला, अमरावती,बुलडाणा,यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे.त्यामुळे आठ दहा दिवसाने दडी मारलेल्या सर्वच पिकांना नवसंजीवनी मिळाली असून,कोठे मुसळधार ते ढग फुटी सदृश्य तर काही भागात हलका बारीक मुरौती पाऊस होत असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.विशेष म्हणजे या संदर्भात आमचे प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी संवाद साधतांना दोन महिन्यापूर्वीच,जिल्ह्याचे आणि शेतकरी राजाचे लाडके हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी "यावर्षी चांगला पाऊस होऊन सगळीकडे पिकपरिस्थिती उत्तम राहणार असल्याने यावर्षी शेतकरी राजा आनंदात राहील.असे भाकीत केले होते." पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले होते की, "चालू वर्षी मान्सूनचा पाऊस वेळेपूर्वी दाखल होईल.मात्र जून महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी राहणार असून साधारतः पेरण्या जूनच्या उत्तरार्धात होतील. तर जुलै मध्ये पिकांना पोषक असा चांगला पाऊस होईल ऑगष्ट मध्येही पाऊस समाधानकारक होईल तर सप्टेंबर मध्ये पावसाचे प्रमाण अल्प प्रमाणात राहतील." हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे हे अचूक अंदाजा करीता राज्यातील हजारो ग्रामस्थ शेतकऱ्यामध्ये सुप्रसिद्ध असून,अनेक शेतकरी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून आपल्या शेतीची कामे करीत असतात.त्यामुळे आमच्या वृत्तसमूहातील मिडिया मधील दैनिक मातृभूमि,दैनिक उज्वल मालेगाव,दैनिक विदर्भ कल्याण,दैनिक विश्वजगत सह साप्ताहिक करंजमहात्म्य, साप्ताहिक शिवनिती, युवा क्रांती समाचार ब्रम्हपूरी आदी अनेकांनी त्यांचे अंदाज मे महिन्याच्या उत्तरार्धात आणि जून महिन्याच्या पूर्वार्धात अनेक वेळा प्रसिद्ध केले होते.आज रोज आम्ही त्यांच्या पूर्वानुमानाची पडताळणी केले असता,चालू वर्षात त्यांचे हवामानाचे सर्वच अंदाज तंतोतंत खरे ठरल्याचे दिसून आले आहे.भविष्यातील अंदाजा संदर्भात महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे कारंजा यांनी आज दि.२६ जुलै २०२५ रोजी भ्रमणध्वनीवरून हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सांगीतले की,सध्या अनुकूल पावसाळी वातावरण असून, आकाशात ढगांची गर्दी आहे. त्यामुळे दि.०१ ऑगष्ट २०२५ पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असून,या दरम्यान चालू आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाडा,पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,झाडीपट्टी,देशपट्टीसह घाटमाथ्यावर आपल्या वाशिम, यवतमाळ,अमरावती,अकोला, बुलडाणा,चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली,नागपूर,वर्धा तसेच वाशिम लगतच्या हिंगोली, परभणी,नांदेड जिल्ह्यात येत्या २९ जुलै पर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून दि. ०१ ऑगस्ट २०२५ पर्यंत चांगला मुरौती पाऊस होऊन पिकाला पोषक ठरणार आहे. तर त्यानंतर दि. ०२ ऑगस्ट ते १५ ऑगष्ट २०२५ पर्यंत चांगलीच उघाड राहण्याची शक्यता असून काही भागात अल्पशा श्रावणसरी कोसळतील.तर दि.१५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री चांगला पाऊस होईल." असे गोपाल गावंडे यांनी कळवीले. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवानी सतर्कता बाळगून आपल्या शेतीची कामे करावी. मधल्या काळात सततधार मुरौती पावसाने नदी,नाले,धरणे तुडूंब भरणार असून अनेक ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने भयावह पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे धरणालगतच्या आणि नदीकाठच्या गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पांदन रस्ते,नदी,नाल्याच्या पुरामधून,पाणी असतांना पुलावरून रस्ता पार करू नये. व मुख्य म्हणजे आपल्या बैलगाड्या,गुरेढोरे,दुचाकी, चारचाकी,प्रवाशी वाहने पुरामधून काढू नये. विजा चमकत असतांना शेतात व हिरव्या झाडाच्या आश्रयाला थांबू नये.निसर्गराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी,पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आणि पुरेशा नैसर्गिक प्राणवायूच्या निर्मिती साठी प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात धुऱ्यावर, नदी नाल्याच्या काठावरील उजाड जागांवर, वड,पिंपळ,कडूलिंब, बेल,आवळा,आंबा,बाभूळ अशा झाडांची जास्तित जास्त लागवड करून वृक्षारोपन व महत्वाचे म्हणजे संवर्धन करावे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....