चीमुर:- मागील दोन महिन्यात दोन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार चिमूर पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचा संशय पोलिसांना आला. चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्येही चांगलीच दहशत पसरली होती. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असता शिशुपाल मारोती माहुरे (२१) रा. हिंगणा जि. नागपूर याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी, पोलीस निरीक्षक मनोज गमने यांच्या मार्गदर्शनात विलास निमगडे, सचिन साठे, शैलेश मडावी यांच्या पथकाने केली.