अकोला-स्थानीय जुन्या शहरातील गीतादेवी खंडेलवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राची मूर्तमेढ रोवण्यात आली.या केंद्राचा प्रारंभ रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता असणाऱ्या व केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली अभिमतच्या या संस्कृत केंद्रातून संस्कृत शिकणाऱ्या नागरिकांना अनौपचारिक संस्कृत शिक्षण देण्यात येणार आहे.हा एक वर्षीय अभ्यासक्रम असून यात नागरिकांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.रविवारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ताराताई हातवळणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री, आ रणजीत पाटील होते.पाहुणे म्हणून समाजसेवी सौ रेखाताई खंडेलवाल,संस्कृत भारतीच्या नगराध्यक्षा सुनंदाताई देसाई, संस्थेचे सचिव गोपालजी खंडेलवाल, केंद्राच्या केंद्राधिकारी आर्यप्रभा काळे,या केंद्राचे अध्यापक ब्रजेश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
अक्षया पुंडलिक,ज्योती जाजू,रूपा ठाकरे यांचे स्वागत गीत व कविता वरघट यांच्या संस्कृत गीताने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.संस्कृत भाषेत असणाऱ्या या कार्यक्रमात अतिथी परिचय वृषाली जोशी यांनी केला.आपल्या प्रास्ताविकात केंद्राधिकारी आर्यप्रभा काळे यांनी या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राची उपयुक्तता प्रतिपादित करीत संस्कृतचा सर्वव्यापी प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्कृत भारतीच्या पाठपुराव्याने या केंद्राची अन्य केंद्रासमवेत मूहुर्तमेळ रोवण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी केंद्राच्या वतीने डॉ रणजित पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आपल्या मनोगतात डॉ रणजीत पाटील यांनी संस्कृत भाषा ही काळाची गरज असल्याचे सांगून संस्कृत भाषेचे संवर्धन करणाऱ्या अशा महाविद्यालयातून संस्कृत भाषेचा वर्ग चालावा हा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगितले. नागरिकांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी या अनौपचारिक शिक्षण केंद्रात सहभागी होण्याचे त्यांनी यावेळी आवाहन करीत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात.
यावेळी संस्थेचे सचिव गोपालजी खंडेलवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत संस्कृत भाषेच्या उपयुक्ततेवर आपले विचार व्यक्त केलेत.अकोलेकरांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आपल्या मनोगतातून केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या अध्यक्षा ताराताई हातवळणे यांनी भावी पिढीसाठी हा उपक्रम उपयुक्त असून संस्कृत मध्ये फार मोठे ज्ञान समाविष्ट असून या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी संस्कृतच्या माध्यमातून अत्यावश्यक आहे.या केंद्राच्या वतीने संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार मोठ्या उमेदीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.संचालन दीपक उगले व धनश्री लोणकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन केंद्राचे अध्यापक ब्रजेश पंडित यांनी मानलेत. शांती मंत्राने या संस्कृत भाषेत असणाऱ्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी या केंद्राचा अध्यापक वर्ग,अनौपचारिक शिक्षण घेणारे महिला,पुरुष,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.