तालुक्यातील आवळगाव, एकारा, मेंडकी, मुडझा, हळदा या परीसरातील अनेक गावे जंगलव्याप्त परिसरात वसले आहेत. या परीसरातील जंगलात वाघांना पोषक वातावरण असल्यामुळे येथे वाघांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या परीसरात अनेकदा मानव-वन्यजीव संघर्ष होत असतो. यामध्ये आतापर्यंत अनेक कुटुंबामधील कर्ता पुरुष, महीला अशा अनेकांचा बळी गेला आहे. घटना घडल्यानंतर अनेकदा तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना करण्यात आली. मात्र या घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने वारंवार ह्या घटना घडत आहेत. ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासुन ३५ किमी अंतरावर असलेल्या हळदा या गावातील दोघांना वाघाने नुकतेच ठार केले आहे.
यामध्ये १२ जुन रोजी राजेंद्र कांबळी यांना तर १४ जुन रोजी देविदास कांबळी यांना ठार केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत दोघांना ठार करणाऱ्या त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी केली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा, एकारा, मेंडकी, आवळगाव, चिचगाव जंगल परीसरात मोठ्या प्रमाणात वाघ असल्याने नागरिकांना नेहमीच दिवसाढवळ्या वाघांचे दर्शन होत असते. मात्र आता घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्याअनुषंगाने हळदा येथे गावकऱ्यांची वनविभागाच्या व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. सदर बैठकीत सुध्दा उपस्थित असलेले माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात व वाघाला जेरबंद करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी बैठकीला वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र शेंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, भाकपचे विनोद झोडगे तथा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांसह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. वनविभाग लपवतोय वाघांची संख्या ब्रम्हपुरी तालुक्यातील जंगल क्षेत्राचा विचार केल्यास जंगलाच्या क्षेत्रफळापेक्षा वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वनविभागाने ब्रम्हपुरी तालुक्यात असलेल्या वाघांची संख्या न लपवता ती संख्या जाहीर करून एकुण जंगलाचे क्षेत्रफळ व वाघांची संख्या याबाबत विचार करून काही वाघांना स्थलांतरित केल्यास अनुचित घटना टाळता येऊ शकतात असे मतही प्रमोद चिमुरकर यांनी मांडले आहे.
शेतीच्या हंगामावर भीतीचे सावट
सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असुन आता शेतीची कामे करायची कशी असा प्रश्न हळदा परीसरातील नागरिकांना पडला आहे. वाघाची दहशत आता शेतात काम करतांना सुध्दा असणार आहे त्यामुळे सदर नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुध्दा जि.प. माजी सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी केली आहे.