सहा महिन्यांपूर्वी घरासमोरून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवत दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार शिक्षा ठोठावली. फिर्यादी पार्थ विनोद अग्रवाल (वय 19 रा. गौरक्षण वॉर्ड) याने आपली 40 हजार किमतीची दुचाकी त्याचे काका दामोधर अग्रवाल यांच्या घरासमोर उभी ठेवली असता अज्ञात चोरांनी ती दुचाकी लंपास केली होती. ही घटना 18 नोव्हेंबरला उघडकीस आली होती.या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा नोंद करून तपासादरम्यान, आरोपी शुभम बलराम हरीणखेडे, (वय 22 रा. उपरवाही, ता. कळमेश्वर) यास अटक करण्यात आली होती. तपासाअंती आरोपीविरुध्द सबळ साक्ष पुरावे मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय, यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी शुभम बलराम हरीणखेडे, याचेविरुध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने 12 मे रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी आरोपीला 2 वर्षे कारावास व 1 हजार द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे.तपास पोलिस हवालदार दीपक राहांगडाले यांनी केला तर सहाय्यक सरकारी वकील सुरेश रामटेके यांनी खटल्याचे युक्तीवाद केले. न्यायालयीन कामकाज पोलिस हवालदार ओमराज जामकाटे, पोलिस शिपाही किरसान यांनी पाहिले. शहर पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल ताजणे व न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.