आमदार राजेंद्र पाटणी यांनी पत्रकारांना त्यांचा सन्मान मिळण्याच्या उपाययोजना कराव्यात.
कारंजा:-
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपल्या देशात पत्रकारांची ओळख आहे. परंतु हे फक्त नावालाच असल्याचा प्रत्यय पत्रकारांना वेळो वेळी येत असतो. वास्तविक पहाता लोकशाहीमध्ये शासन आणि सर्वसामान्य नागरीक यांचा समन्वय साधून,शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी आणि समाजातील सर्वसामान्य नागरीक यांना त्यांचे न्यायहक्क मिळवून देण्याकरीता पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे,स्वतःच्या कुटूंबाकडे दुर्लक्ष्य करून आणि स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, आपल्या देशासाठी आणि सभोवतालच्या समाजासाठी राबराब राबत असतो.आणि अशा परिस्थितीत निव्वळ निःस्वार्थ सेवा देणाऱ्या पत्रकाराला केवळ आणि केवळ सन्मान मिळावा ही क्षुल्लक अपेक्षा तो ठेवत असतो. परंतु त्याची जाण ना शासनाला असते ना प्रशासनाला. आणि लोकप्रतिनिधीला तर अजिबातच नसल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे.याबाबत आपला संताप व्यक्त करतांना महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे की, "आम्ही उदार अंतःकरणाने शासन आणि शासनकर्ते लोकप्रतिनिधी यांच्या बातम्या घेण्याकरीता जीवाचे रान करतो." त्यामुळे एखादी उच्च पातळीवरील व्हिआयपी व्यक्ती, मुख्यमंत्री,केन्द्रीयमंत्री,राज्यपाल इत्यादीचे कार्यक्रम ज्या ज्या वेळी होतात.त्या त्या वेळी पत्रकारांना कार्यक्रम स्थळी प्रवेशा करीता पोलीस प्रशासनाकडून प्रवेशपत्रिका (पासेस)मिळायला हव्यात.शिवाय लोकप्रतिनिधीनी सन्मानपूर्वक "पत्रकार-परिषद" घेऊन,पत्रकारांना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरीता प्रश्न विचारण्याची संधी देऊन लोकशाही टिकवायला हवी. व पत्रकारांना त्यांचा सन्मान द्यायलाच हवा.परंतु दुदैवाने तसे होत नाही. व दि 23 नोहेंबर 2023 रोजी केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या आगमन प्रसंगी सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांना प्रवेश पत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे निदान यापुढे भविष्यात तरी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ आमदार राजेंद्र पाटणी यांनी स्वतः गंभीर दखल घ्यावी व प्रशासनाला सूचना देऊन पत्रकारांना त्यांचा सन्मान द्यावा अशी विनंती वजा मागणी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केली आहे.