अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकाचे वर्णन आढळते. गौरी पुत्र गणेश म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बाप्पाला अनेक नावाने संबोधले जाते. आज आपण महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थानाचे महत्त्व थोडक्यात बघू या.
१) मोरगांवचा मयुरेश्वर
पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे असणारे हे बाप्पाचे मंदिर पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यात हे गाव बारामती तालुक्यात स्थित आहे. या गांवात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचे म्हणून याला मोरगांव असे नांव पडले. मयुरेश्वर हे गणपतीची स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख असून सोंड डावीकडे वळलेली आहे. मुर्तीच्या डोळ्यात व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहेत. मूर्तीवर नागाचे फण्याचे छत्र आहे. मुर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत. गणपतीपुढे उंदीर व मोर उभे आहेत. मोरगांवातील कऱ्हा नदीच्या काठावरील मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले. गणपतीसमोर नंदीची भव्य मूर्ती आहे. मोरावर आरुढ असलेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधुसूराचा वध केला व पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले.
२) सिद्धटेकचा सिद्धीविनायक
सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिथ्दीविनायकाचे मंदिर म्हणजे अष्टविनायक दुसरा गणपती. अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या तिरावर वसलेले आहे. ही मूर्ती उत्तराभिमूख असून जीची सोंड उजवीकडे आहे. मूर्ती तीन फूट उंच आहे. गणपतीने पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी, सिद्धी विराजमान आहे. देवळाच्या डोंगराला एकवीस दिवस प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्त्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्णत्वास जाते असे भाविक भक्त समजतात. या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. भगवान विष्णू ध्यान निद्रेत असताना त्याच्या कानातून उत्पन्न झालेले मधु व कैटभ दानव ब्रम्हदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणीत होते. त्या दानवासोबत विष्णूने युद्ध केले पण भगवान विष्णू पराजीत झाले. विष्णूने सिद्धटेक येथेच गणपती स्थापन करुन आराधना केली. नंतर विष्णूने मधु व कैटभ दानवाचा पराभव केला.
३) पालीचा श्री बल्लाळेश्वर
रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायकाचे तिसरे स्थान. बल्लाळेश्वर गणेशाची मूर्ती पूर्वाभिमूख असून अरुंद मूर्ती आहे. तिचे कपाळ मोठे असून सोंड डावीकडे झुकलेली आहे. मूर्तीच्या डोळ्यांत व नाभीत हिरे जडविलेले आहे. मूर्तीचे मागे रिद्धी, सिद्धी उभी आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. हिवाळ्यात सूर्याची किरणे बल्लाळेश्वराचे मूर्तीवर पडतात. त्रेतायुगात कल्याण नावाचा वाणी याला बल्लाळ नावाचा पुत्र झाला. तो गणेश भक्त होता. म्हणूनच या गणपतीला बल्लाळ विनायक असे नाव पडले.
४) महडचा श्री वरदविनायक
रायगड जिल्ह्यातील महड येथील वरद विनायकाचे मंदिर हे चौथे अष्टविनायक आहे. भक्ताची इच्छा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा असा या बाप्पाची ख्याती आहे. १६९० साली धोंडू पौढकर याला स्वप्नामध्ये देवळाचे मागे तळ्यात मूर्ती असल्याचे दिसले. ती मूर्ती बाहेर काढून स्थापना केली. मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे. १७२५ मध्ये सुभेदार रामजी भिवलकर यांनी मंदिर उभे केले. ते मंदिर कौलारू आहे. घुमटाला सोनेरी कळस आहे. देवळाच्या चारही दिशांना हत्तीची प्रतिकृती साकारली आहे. राजा भीम याच्या पत्नीला गणेशाचे कृपेने रुक्मंद नावाचा पुत्र प्राप्त झाला. त्याने गणेशाची घोर साधना केली. गणेश प्रसन्न होऊन त्याला वर दिला. हा गणपती भक्तांचे विघ्न दूर करतो.
५) थेऊरचा श्री चिंतामणी
हा अष्टविनायक पाचव्या स्थानावर असलेले बाप्पाचे मंदिर पुणे जिल्ह्यातील थेऊर या गावी वसलेले आहे. भक्ताच्या चिंता दूर करतो म्हणून या गणपतीला चिंतामणी म्हणतात. ही मूर्ती पूर्वाभिमूख असून सोंड डावीकडे आहे. गणपतीचे डोळे रत्नजडित आहेत. संत मोरया गोसावी याने तपसाधना करत सिद्धी प्राप्त केली. गणासूर असूराने कपिल ऋषीकडे असलेली चिंतामणीचे रत्ने चोरली. हे रत्न परत मिळविण्यासाठी दुर्गादेवीने कपिल ऋषींना गणपतीची आराधना करून मदत मागण्यास सांगितले. नंतर गणपतीने गणासूराचा वध करुन ते रत्न मिळविले व कपिल ऋषीला परत केले, ते रत्न चिंतामणीचे गळ्यात घातले, तेव्हापासून गणपतीला चिंतामणी हे नाव प्राप्त झाले.
*६) लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक*
शिवनेरीच्या लेण्याद्रीच्या कुशीत वसलेले गिरिजात्मजाचे मंदिर म्हणजे अष्टविनायकाचे सहावे स्थान. देवी पार्वतीने पुत्र प्राप्तीसाठी येथे तपसाधना केली होती म्हणून पार्वतीचा म्हणजेच गिरीजेचा पुत्र गिरिजात्मक म्हणून गणपतीला ओळखले जाते. हे मंदिर उत्तराभिमूख असून सोंड डावीकडे वळलेली आहे. कपाळावर व नाभीत हिरे जडविलेले आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला महादेवाची व डाव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे. हे मंदिर जुन्नर तालुक्यात लेण्याद्री या डोंगरावर एकूण अठरा गुहा आहेत. आठव्या गुहेत गिरिजात्मजाची मूर्ती आहे. मंदिरातील खांबावर वाघ, सिंह, हत्ती कोरलेले आहे. गणेश आपला पुत्र म्हणून जन्माला यावा, यासाठी पार्वतीने तपश्चर्या करून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी देवीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून गणेशाची मूर्ती बनविली व त्या मूर्तीतून श्री गणेशाची निर्माती झाली.
*७) ओझरचा श्री विघ्नेश्वर*
जुन्नर तालुक्यातील ओझर हे अष्टविनायकाचे सातवे स्थान. विघ्नासूराचा नाश करण्यासाठी गणपतीने विघ्नेश्वराचा अवतार घेतला होता. ही मूर्ती पूर्वाभिमूख असून सोंड डावीकडे तसेच ड्योळ्यामध्ये माणिक व कपाळी हिरे जडविलेले आहेत. तर दोन्ही बाजूस रिद्धी, सिद्धी यांच्या मूर्ती आहे. इंद्रदेवाने निर्माण केलेल्या विघ्नासूराचा नाश करण्यासाठी श्री गणेशाने हे अवतार घेतले होते. तसेच अष्टविनायकातील हा गणपती सर्वात श्रीमंत समजला जातो. हे मंदिर चिमाजी आप्पा यांनी १७८५ साली बांधले. मंदिराचे मुख्य दरवाज्यावर चार द्वारपाल उभे आहेत. मंदिराचा कळस व शिखर सोनेरी आहे. पुढे भव्य सभागृह आहे. गणेशाने विघ्नासूराचा वध केला. इच्छा व्यक्त केली तेव्हापासून गणपतीला विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले.
*८) रांजणगांवचा श्री महागणपती*
पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील रांजणगावात महागणपतीचे आठवे स्थान. हा अष्टविनायक सर्वात शक्तीशाली गणपती आहे. ही मूर्ती कमळावर आसनस्थ असून डाव्या सोंडेची आहे. दोन्ही बाजूस रिद्धी, सिद्धी उभ्या आहेत. त्रिपुरासूराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी याठिकाणी गणपतीची आराधना केली होती. नवसाला पावणारा गणपती आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून मंदिराचा गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला.
अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या आठ स्वयंभू स्थानांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच गणेश उत्सवा प्रित्यर्थ महाराष्ट्रातील अष्टविनायकाला शत् शत् प्रणाम ! गणपती बाप्पा मोरया !
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....