अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जात आहेत.दि 21 जून २०२४ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , जिल्हा क्रीडा विभाग , पतंजली परिवार अकोला व दिव्य ज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्था अकोलाच्या संयुक्त आयोजनात दिव्यांग व्यक्तींसाठी महाराष्ट्रात प्रथमच योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
23 जून पर्यंत सकाळी ८-९ या वेळात सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल रामदास पेठ अकोला येथे होऊ घातलेल्या योग कार्यशाळेला पहिल्याच दिवशी अकोला जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे . अंध,अस्थिव्यंग, मूकबधिर व मतिमंद अशा विविध दिव्यांगत्व असणाऱ्या आबाल - वृद्धांनी या शिबिराला उपस्थित राहून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.क्रीडापटू सकाळी उठून योग, व्यायाम व इतर क्रीडा प्रकारात रुची घेत असलेले आपण पाहतोच परंतु आपल्या अपंगत्वावर मात करून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या प्रेरणेने हे सर्व दिव्यांग व्यक्ती योग कार्यशाळेत सर्वसामान्यांना लाजवतील असे योग प्रकार करीत होते.सदर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून श्री. गजानन महाराज मंदिर मुकुंद नगर चे अध्यक्ष श्री गजानन पांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सुहास काटे,सौ भारती शेंडे,डॉ.राजेश भोंडे, डॉ.विशाल कोरडे,श्रद्धा मोकाशी,श्री हरीश पारवानी,श्री हरीश माखेजा तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीश चंद्र भट, अनिता उपाध्याय, डॉ.दिपाली काळे,डॉ.योगेश शाहू व सारिका तिवारी उपस्थित होते.दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचा दिव्यांग सदस्य मोहम्मद शोएब यांनी योगगीत गाऊन शिबिराचा प्रारंभ केला. डॉ.विशाल कोरडे यांनी प्रास्ताविकात दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांना रोजगार देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले . मार्गदर्शक सुहास काटे, भारती शेंडे व डॉ.राजेश भोंडे यांच्या मार्गदर्शनात उपस्थित दिव्यांग शिबिरार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला . सदर शिबिरात योग, प्राणायाम, आहार विहार व जीवनशैली अशा विविध विषयावर मार्गदर्शन करणार असून ज्यांना या कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आव्हान प्रतिभा काटे यांनी केले आहे* . योग कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ राहटीया, अनामिका देशपांडे, सरोज तिडके, अरविंद तिडके, नेहा पलन, अस्मिता मिश्रा, श्रीकांत बनसोड, विजय कोरडे, सुनिता कावळे, मनीषा कुलकर्णी व संदीप गोळे यांनी सहकार्य केले .