कारंजा (लाड) : कारंजा येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, तेली समाजातील आदर्श नेते, कारंजा नगर पालिकेचे माजी बांधकाम सभापती स्व.श्री. विष्णुपंत सदाशिवराव गुल्हाने यांचे आकस्मिक आजाराने शुक्रवार दि.०१ नोहेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० चे दरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र आप्तेष्ट,सगेसोयरे, मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.ऐन दिपावली महालक्ष्मी पूजनाच्याच दिवशी त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरल्याने संपूर्ण परिसरात कुणीही दिवाळी साजरी केली नाही.स्व.श्री. विष्णुपंत गुल्हाने अत्यंत गरीब परिस्थिती मधून आलेले व्यक्तिमत्व होते.परंतु स्वकतृत्वाने त्यांनी आपले यशस्वी जीवन घडवीले.कारंजा नगर परिषदेला त्यांनी सेवा दिली. ही सेवा देत असतांना अनेक लोकांना रोजीरोटी देण्याकरीता त्यांनी,नगर पालिकेच्या सेवेत असतांना कोणतीही जात पात धर्म न पहाता एक दोन नव्हे तर शेकडो हिंदु मुस्लिम तरुणांना रोजंदारीवर कामे देवून नगर पालिकेच्या नोकरीत कायम केले होते.त्यापैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून अनेक कर्मचारी आजही नोकरीत आहेत.तसेच त्यांनी अनेक ठेकेदार घडविण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली.त्यांच्या कामाची विशेषत: म्हणजे स्वतः मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष त्यांच्या भेटीला व त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत होते. नोकरीमधून सेवानिवृत्त झाल्या नंतर त्यांनी लोक आग्रहास्तव कारंजा नगर पालिकेची निवडणूक लढवीली व चांगल्या मताधिक्याने जिंकली.त्यानंतर त्यांनी बांधकाम विभागाचे सभापती पदही यशस्वीरित्या सांभाळले होते.महाराणा प्रताप व्यायाम शाळेच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव आणि श्री दुर्गोत्सवात त्यांचा मोठा सहभाग असायचा.कारंजा शहरातील अनेक विकासाची कामे त्यांनी करून घेतली होती.त्यामुळे आज त्यांच्या निधनाने आपले कारंजा शहर एका चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला मुकल्याची भावना नागरीकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मागे पत्नी, लहान भाऊ, बहिनी, तिन मुले, पुतने, सुना,नातवंडे असा फार मोठा आप्त परिवार आहे. शुक्रवारी दि ०१ नोहेंबर रोजीच दुपारी ०४:०० वाजता त्यांच्या मंगरूळ वेशीजवळील निवास स्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दारव्हा यवतमाळ मार्गावरील हिंदु स्मशानभूमी मध्ये त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या मोठ्या मुलाने रविन्द्र गुल्हाने यांनी त्यांना भडाग्नी दिला. त्यानंतर झालेल्या शोकसभेत दिव्यांग जनसेवक ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवा पत्रकार किरण क्षार आदींनी तसेच आई श्री कामाक्षा मित्र मंडळ, महाराणा प्रताप व्यायाम शाळा, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार, नगर परिषद कारंजा, कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा,कारंजा पत्रकार मंच कारंजा आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करून त्यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली.