जगातील सुप्रसिध्द प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी तळागाळातील गोरगरीब, मागासवर्गीय,अल्पसंख्याक, आदिवासी,झोपडपट्टीधारक व पालावर राहणाऱ्या लोकांकरीता जाहिर केलेल्या योजनांचा,संपूर्ण जगात बोभाटा करून,वृत्तपत्रांना मोठमोठ्या जाहिराती देऊन प्रसिद्ध करीत मोठा गाजावाजा करीत शुभारंभ तर करण्यात आला.परंतु आतामात्र त्याची अंमलबजावनीच नसल्याने त्या योजना अडगळीत जमा होण्याचीच जास्त चिन्हे आहेत. जसे की,कामधंदे सोडून लोकांना जन धन योजनांचे बँक खाते काढायला लावले होते.परंतु लाखो गोरगरीब झोपडपट्टीवासियांचा त्या खात्यामध्ये व्यवहारच नाही. शिवाय खाते काढते वेळी शासनाकडून जनधन खात्यात पैसे टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र शासनामार्फत एक रुपयाही टाकला जात नसल्याने ही योजना प्रलंबित आहे.शासनामार्फत प्रधानमंत्री विमा योजनेचे पैसे नियमीत कपात होतात याची माहितीच नागरीकांना मिळत नसल्याने या योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळतच नाही. उज्वला गॅस योजना धुमधडाक्यात सुरु करून आदिवासी,झोपडपट्टीधारकांना गॅस जोडणी देण्यात आली.परंतु गॅस सिलेंडरचे भाव चौपटीने वाढल्याने लोकांकडे सिलेंडर आणायला पैसे मिळत नाही.गॅस सिलेंडर वर मिळणारी सबसिडी बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या लोकांना परत चुली वरील स्वयंपाकाकडे वळावे लागले.प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजनेद्वारे स्वतःचे,हक्काचे घर देवू, दिव्यांग,बेघर,निराधारांना जमिनी सह तयार घरकुल देवू . ह्या प्रधानमंत्री नरेंद्रभाईनी दाखवीलेल्या स्वप्नाचा भंग झालेला आहे.त्यामुळे गोरगरीबांना खोटी आमिष दाखवून प्रत्यक्ष शासनानेच त्यांची फसवणूक केल्याचे चित्र दिसत आहे.शिवाय आता कोणताही मंत्री,खासदार,आमदार लोकसभेत-विधानसभेत गांभिर्याने या विषयावर बोलत नसल्याने व गरीबी निर्मूलनावर निर्णय होत नसल्याने शासनाच्या योजना कुचकामी ठरल्याचे निर्विवाद सत्य आहे.असेच म्हणावे लागेल असे वृत्त जनतेच्या तक्रारीवरून,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.