वाशिम : राज्याच्या अनेक भागात आज-उद्या-परवा,तिन चार दिवसात वादळाचा खूप मोठा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे .याबद्दल अधिक वृत्त असे की,मागील तिन दिवसांपासून राज्यात व विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरणाने तापमानात फार मोठी घट झाल्याचे चित्र असून,नागरिकांना प्रखर उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.परंतु असे असले तरी उकाड्याने नागरीक बेजार झाल्याचे दिसून येते.शिवाय कमी अधिक प्रमाणात असलेले वारे आणि अचानक पडणारा रिमझिम पाऊस यामुळे विद्युत वितरण कंपनीची बत्ती गुल होऊन,नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.तर ग्रामिण विभागातील विज रात्रभर बंद रहात आहे. त्याचा सर्वाधिक त्रास लहान बालके व वयोवृद्ध,दुर्धर आजारग्रस्त,दिव्यांग जन,गरोदर महिला यांना होत आहे.शिवाय हिंद महासागर आणि अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे,पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागात, वादळाचा जोरदार तडाखा बसण्याचे अनुमान राज्याच्या हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत असून, हवामान विभागाने राज्यातील अठरा जिल्ह्यात रेडअर्लट जारी केल्याची माहिती मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील वाशिम-यवतमाळ -अमरावती जिल्ह्यात चक्री वादळाच्या अंदाजामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी चालू आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी.कृषी उत्पन्न बाजार समिती वा बाजारपेठेत आपला शेत माल उघडयावर ठेवू नये.या काळात ढगाचा गडगडाट आणि विजाचा थयथयाट लक्षात घेऊन,शेतातून शक्य तेवढ्या लवकर आपआपल्या घराकडे परतावे. विशेषतः मेंढपाळ आणि गुराख्यांनी आपल्या शेळ्या मेंढया गुराढोरांची काळजी घेऊन त्यांना दुपारी ०४:०० चे सुमारास सायंकाळ पूर्वीच घराकडे परत आणावे. विजा पडण्याची संभावना असल्यामुळे शेतातील हिरव्या झाडाखाली,विद्युत खांबाजवळ,आकाशाखाली उघड्यावर बसवू नये व स्वतः देखील झाडाखाली आडोशाला जाऊ नये.विजेची उपकरणे व मोबाईल बंद ठेवावी.अवकाळी पावसामुळे शेतातील संत्रा,आंबा, पालेभाज्या,भाजीपाला,गुलाब शेवंतीची फुले आदी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे 'आपली सुरक्षा आपल्या हाती' या म्हणी प्रमाणे बळीराजाने होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा.असेही संजय कडोळे यांनी राज्याच्या हवामान शास्त्राच्या हवाल्यावरून म्हटले आहे.