वाचणाऱ्याने सदोतीत वाचत राहिले पाहिजे आणि वाचता वाचता लिहिते झाले पाहिजे आणि लिहिणाऱ्याने लिहीता लिहीता आपल्या मनातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही घटना, गोष्टी दृष्टीपथात येतात ..ते आपल्या लेखणीतून कागदावर उतरावयाला पाहिजेत, तरच त्या वाचणाऱ्याचे निरीक्षण लेखणीद्वारे कागदावर उतरणे म्हणजेच शब्द साधनेची खरी फलश्रुती होय , असे वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्ष, लेखिका, प्रवचनकार पद्मभूषण माननीय श्रीमती सुमित्राजी महाजन यांनी डॉ. विनय वसंतराव दांदळे यांच्या "संध्याकाळचं डायरी रायटिंग "ह्या लेखसंग्रह प्रकाशनप्रसंगी काढले.
अमळनेर येथे पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपले अकोलानगरीतील
डॉ. विनय वसंतराव दांदळे यांच्या
" संध्याकाळचं डायरी रायटिंग " या लेखसंग्रहाचे प्रकाशन लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण माननीय श्रीमती सुमित्राजी महाजन यांचे शुभहस्ते तसेच अखिल भारतीय मराठी महामंडळाचे सदस्य, प्रभात किड्सचे संचालक माननीय डॉ. गजानन नारे तसेच ज्येष्ठ कथाकार, कवी महाराष्ट्र शासन पुरस्कार वाङ्मय पुरस्कारप्राप्त माननीय सुरेश पाचकवडे, दऊत लेखणीचे संपादक विजय देशमुख, विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे प्रा. डॉ.. गजानन मालोकार यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
मनात असणाऱ्या विचारांना वाट मोकळी करून देता यावी म्हणूनच डायरी रायटिंग असतं, आपल्या दैनंदिन जीवनातील निरीक्षणं, अनुभव, अनुभूती विविध अंगी विचार अशा सगळ्या बाबी डॉ. विनय दांदळे यांनी रसिक मनानं आणि अभ्यासू दृष्टीने या पुस्तकात मांडले आहेत असे भावोगार डॉ. गजानन नारे यांनी काढले, तर डायरी ही आपल्या जिवन प्रवासातील साक्षीदारापेक्षा ती वाटेकरी जास्त असते, दैनंदिन आयुष्य प्रवासात माणसाच्या स्वभावाचे विविध छटा सूक्ष्मरीतीने टिपत त्यावर भाष्य व प्रकाश टाकणारा डॉ. विनय दांदळे यांचे हे पुस्तक आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे यांनी काढले.
डॉ. विनय दांदळे यांचं हे प्रकाशित झालेलं ३७ वे पुस्तक असून यापूर्वी त्यांची विविध विषयांवर ३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे ते सचिव असून विविध साहित्यिक चळवळींमध्ये ते सक्रिय असतात. त्यांच्या ह्या पुस्तक प्रकाशनाबद्दल साहित्य क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.