वाशिम : डिजेचा खर्च लाखोच्या घरात येतो. शिवाय मुळात डिजे वाजविणे ही आपली महाराष्ट्रीयन किंवा भारतिय संस्कृती नसून निव्वळ नाचगाण्याचा धांगड धिंगाणा आहे.तुम्हाला तुमचे खूप मोठे दानशूर असणारे नेते व आगामी आमदार डिजे करीता देणग्या देतही असतील तरी त्या पैशाने डिजे लावण्यापेक्षा ती रक्कम समाजोपयोगी लेझिम, वाद्य,क्रिडा,खेळ,व्यायामाचे साहित्य, मंडळाच्या मुला मुलींना युनिफॉर्म, तरुणांना कपडे किंवा मंडळाचे महिलांना नऊवारी किंवा साड्या घेण्याकरीता वापरा. देणगी दात्यांकडून तुम्ही मंडळासाठी खेळाचे साहित्य व युनिफॉर्म तसेच अन्नदान महाप्रसाद भंडाऱ्या करीता लागणारी स्वयंपाकाची भांडी घेतली तर मंडळाच्या सभासदांना आणि परिसरातील गोरगरीबांना नेहमीच्या कामात उपयोगी पडतील.त्यामुळे डिजेचा वायफळ होणारा खर्च टाळून वर्गणीच्या पैशाचा सर्वांनी सदुपयोग करावा. डिजेच्या दणदणाटी प्रचंड व कर्कश अशा आवाजाने आणि फोकस लाईटच्या लेजर किरणाने आपल्या मधीलच दुर्धर आजार ग्रस्त असलेल्या व्यक्ती, रक्तदाब व मधुमेहाचे रुग्न,गरोदर महिला व म्हाताऱ्या व्यक्ती सोबतच सर्वांच्या आरोग्याचे प्रचंड नुकसान होण्याची भिती आहे. डिजेमुळे डोळ्याची दृष्टी कमी होण्याची किंवा कायमचे आंधळे होण्याची,कानठळ्या फुटून कर्णबधिर होण्याची शक्यता आणि महत्वाचे म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचा संभवही असतो.डीजेमुळे मागील वर्षी कारंजा (लाड) येथील डॉ. डोणगावकर व डॉ. कांत हॉस्पिटलच्या रुग्नांना त्रास झाला. शिवाय माजी नगराध्यक्ष विजय बगडे यांच्या बंगल्यातील पिओपी चे छत पडले.अनेकांच्या भितींना तडे गेले.अशा दुर्घटना घडल्या. त्यामुळे श्रीगणेशभक्त न श्रीनवदुर्गा उपासकांनी यापुढे डिजेचा नाद न करता,आपल्या महाराष्ट्रातील स्वदेशी खेळ, पंजाबी भांगडा, दांडिया, टिपऱ्या,गरबा,सांस्कृतिक कार्यक्रम,परंपरागत लोककला,भजन,गवळण, भारूड,गीतगायन,करावते आणि वारकरी दिंड्याना मिरवणूकी करीता महत्व दिले तर त्यामधुन आपल्या ऐतिहासिक,सांस्कृतिक कलेचे प्रदर्शन होऊन चांगला पायंडा पडेल त्यामुळे मंडळानी डिजेच्या माध्यमातून आपल्या आरोग्याचे व पैशाचे नुकसान न करता यापुढे डिजे लावणे सोडून पारंपारीक वाद्याला महत्व द्यावे असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष,शांतता समन्वय समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.