कुरखेडा : कोरची ते कुरखेडा मार्गावरील बेडगाव पुढील झानकारगोंदी गावानजीक एमएच 22 डी 1990 क्रमांकाची प्रवासी टॅक्सी पलटून आज (१०) सायंकाळी भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टॅक्सी कोरची येथून प्रवासी घेऊन कुरखेड्याकडे येत असताना बेडगावनंतर असलेल्या झनकारगोंदी नजीकच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेग आणि वळण यामुळे टॅक्सी रस्त्याच्या बाजूला पलटून मोठा अपघात घडला यात मोठे नुकसान झाले. घटनेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली व जखमींना बाहेर काढत रुग्णवाहीकेच्या माध्यमातून रुग्णालयात हलविले.
या अपघातात कोरची तालुक्यातील अलीटोला ग्रामपंचायत मध्ये सचिव म्हणून कार्यरत असलेले दिलीप रामचंद्र धाकडे यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांची नावे रात्रीपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाहीत. या भागात अपघातांची मालिका सुरू असून स्थानिकांनी वेगमर्यादा व रस्ते सुरक्षा उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे. घटनेचा तपास पोलीस स्टेशन कोरची चे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.