भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ! नरदेह म्हणजे घबाड आहे कारण नरदेहामध्ये ब्रम्ह पूर्णपणे जाणण्याचे सामर्थ्य आहे. माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो तो मला आनंद स्वरुप परमात्म्याला प्राप्त होतो. मी भावाचा, भक्ताच्या प्रेमाचा भुकेला आहे. अशा भक्ताला मी माझ्यात सामावून घेतो. देवादिक सुद्धा नरदेह प्राप्त व्हावा म्हणून धडपडत असतात कारण हे मानवी शरीर तिन्ही लोकांत पवित्र आहे.
काय योग साधला? जन्म तुला लाभला ।
कोण देव पावला? बिचाऱ्या, भजनासी लागला रे ।।धृ।।
कलियुगातील मानवास प्रबोधनपर हा अभंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. मनुष्य जन्म मिळणे ही एक मोठी संधी आहे आणि मनुष्य जन्म मिळणे हे अत्यंत दुर्लभ आहे. ८४ लाख योनी भटकल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. तु कोणता योग साधला तुला मनुष्य जन्म मिळाला. तु मागील जन्मात चांगले कर्म केले म्हणून हा मनुष्य जन्म मिळाला. वाईट कर्म केले तर इतर योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. तुझ्यावर कोणत्या देवाने कृपा केली. तू अभागा असून हरिभजनासी लागला. हरिभजनामध्ये रममान होणे ही एक दैवी कृपा आहे.
असशिल केले पुण्यदान त्वा, अथवा साधू सेवा ।
म्हणूनी कळले तुजला सखया, अंतरी देव भजावा ।
धर्म हाचि आपुला, कोणी तुला दाविला ।।१।।
साधू सेवा एक महान आणि पवित्र सेवा आहे. ती व्यक्तीला आध्यात्मिकरित्या समृद्ध करते. "हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।" दानधर्म, साधूसेवा सोबतच मुखाने नेहमी देवाने नाव घेतल्याने पुण्य मिळविले म्हणून तुला अंतरीचा देव भजावा असे तुझ्या मनाला वाटले असेल. आपल्या अंतःकरणात देवाची भक्ती करावी. बाह्यपूजा किंवा धार्मिक विधीपेक्षा आपल्या आत असणाऱ्या देवाची आठवण ठेवावी. नामस्मरण करणे म्हणजेच भजन होय. हरिभजनाविन राहू नये हे तुला कळले आणि धर्म सुद्धा कळला. धर्माची शिकवण साधू संत देत असतात. "धर्म लयाला जातो तेव्हा रामकृष्ण हरी येतो" असे राष्ट्रसंत म्हणतात.
कितीतरी असती लोक जगामधी, देव तया ना ठावे ।
खावे ल्यावे प्यावे, सगळे म्हणती मरुनी जावे ।
तूच कसा त्रासला? नादी या उल्हासाला ।।२।।
या जगातील कितीतरी लोक देवाबद्दल अनभिज्ञ असतात. अशांना देवाची जाणीवच नसते. देव सर्व काही पाहतो हे सुद्धा त्यांना कळत नाही. खावे प्यावे आणि मरुन जावे असे सगळेच म्हणतात. देवाने मरण्यासाठी जन्म दिला नाही. मानवी जीवाचा उद्देश मृत्यूसाठी तयार होणे नसून जगणे, अनुभवणे, शिकणे यासाठी आहे. तू कसा जीवनाला कंटाळला, वैतागला आणि शेवटी हरीभजनासी लागला. जीवन हा एक नदीचा प्रवाह आहे. कधी आनंद तर कधी दुःख भोगावे लागते.
बाळपणी खेळाशी खेळती, तरुणपणी विषयाशी ।
वृद्धपणी मग जाति इंद्रिये, मार्ग दिसेना त्यासी ।
हेतू कसा जाणला, अनुभवा आणला ।।३।।
कर्तृत्व गाजवण्याची इच्छा ही बालपणी खेळाकडे खेचत असते. आपण बरेचदा म्हणतो, "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" मुंगी लहान असून ती साखरेचा रवा खायला घेऊन जाते. त्याचप्रमाणे मोठेपणी अडचणी, दुःख भोगावे लागते. बालपण निघून गेले की, तरुणपणात विषयसुख उपभोगतो. जसेः- चव, वास, स्पर्श, दृष्टी, श्रवण. तरुणपणी आत्मिक सुखाचा, मनःशांतीचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. वृद्धपणी इंद्रिये जातात. दृष्टी, श्रवण, स्मरणशक्ती कमी होते. वृद्धपणी समस्येला किंवा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. म्हणून तू हेतू जाणला आणि अनुभवला आणि हरिभजनाशी लागला. "बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले । वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर । जन्ममरण नको आता, नको येरझार ।" बालपण खेळण्यात रममान होऊन तसेच तारुण्य वासनेच्या मागे वाया गेले आणि राहिलेल्या वृद्धपणात पैलतीर (भवसागर) पार करावा असे वाटते. हरिभजन करुन जन्म मरणाची येरझार चुकवावी असे वाटत असते.
जाशी तमाशा खाऊनी मासा, पिऊनी गांजा दारु ।
कोणी पुसेना त्यांना जगती, म्हणती मारु-मारु ।
तूच कसा वाचला, रंगणी या नाचला ।।४।।
किर्तनाने सुधरत नाही व तमाशाने बिघडत नाही असे लोक म्हणतात. तमाशा पाहायला जातात आणि मासांहार करतो तसेच मित्रासोबत गांजा, दारु प्यायला लागतो. अशा बिघडलेल्या व्यक्तीकडे कोणी ढुंकूणही पाहत नाही. लोक त्याला मारायला धावतात. तू कसा काय बिघडला नाहीस. तू हरिभजनाचे मागे लागला. "रंग आणा हो रंगणी, देवा या हो या किर्तनी" रंगणी म्हणजे हरिभजनात तल्लीन होणे. हरिभजन गाता गाता नाचायला लागलास.
पूर्वीपासूनी असशिल केली, जोड तुवा पुण्याची ।
तुकड्यादास म्हणे, म्हणुनी तुज जोड मिळाली याची ।
नरदेह तारिला, जन्म हा उद्धारीला ।।५।।
मागील जन्मात केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुला भाग्य लाभले व त्याचेच फळ मिळाले. मागील जन्मी दान, गरजूंना मदत, धार्मिक कार्य केले म्हणून तुला पुण्याची जोड मिळाली. राष्ट्रसंत म्हणतात, तुला पूर्व जन्माचे संचितामुळे पुण्य प्राप्त झाले आणि याची जीवनाला जोड मिळाली. यामुळेच तुझा नरदेह उद्धारीला. तुला मोक्ष मिळावा, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे म्हणून हरिभजन करायला लागलास. जीवन सुखी, सार्थक करणे म्हणजेच उद्धार होणे.
लेखक:-
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....