कारंजा : "श्री गणेशोत्सव आपले आराध्य आहेत. सौख्य,मांगल्याचे प्रतिक आणि संकटनाशक विघ्नहर्ता म्हणून आपण त्यांचे क्षणोक्षणी पूजन आणि चिंतन करीत असतो. श्री गणेशोत्सवानिमित्त गेल्या आठवड्यापासून आपण त्यांचा उत्सव थाटामाटात साजरा केला असून आता अनंत चतुर्दशीच्या, शुक्रवारी दि ९ सप्टेंबर रोजी बाप्पांना निरोप देणार आहो." त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांना कळकळीची विनम्र प्रार्थना आहे की, मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे देखावे, लेझीमपथक, भांगडा नृत्य आदी पथकासह मिरवणूक काढावी. बाप्पाच्या मंडळासोबत मंडळाचे ज्येष्ठ सभासदांना स्वयंसेवक म्हणून ठेवावे. आपल्या नगरीत शांती-सलोखा-सौजन्य-एकात्मता आणि आपल्या कारंजा शहराचा नावलौकिक कायम राखून तसेच महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी राहून सर्वांनी, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून बाप्पांची मिरवणूक काढावी व बाप्पांना निरोप द्यावा. तसेच मिरवणूकीत सहभागी होतांना कोणत्याही भक्तमंडळी किंवा समाजबांधवांनी दारू गांजा आदी नशेचे व्यसन करू नये. किंवा मिरवणुकीत कुण्याही दारुड्या व्यसनाधिन व्यक्तिने सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर त्याचे सोबत वादविवाद न करता, शांती सलोख्याने बाहेर काढावे आणि तरीही व्यत्यय येत असल्यास,सरळ सरळ त्याला पोलिस प्रशासनाच्या सुपूर्द करावे. व मिरवणुकीमध्ये शांतता व शिस्त बाळगून बाप्पांची विसर्जन मिरवणूक आनंदाने आणि निर्विघ्नपणे पार पाडावी." असे आवाहन, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे व्यसनमुक्ती प्रचारक तथा महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त समाजसेवक, संजय कडोळे यांनी केले आहे.