आजचा काळ हा संगणक युगाचा व तंत्रज्ञानाचा काळ आहे. यामुळेच मानवी समाजाने भौतिक विकासात नेत्रदिपक प्रगती केली. ह्या सर्व गोष्टी शिक्षणामुळे घडल्या आहे. भौतिक जीवन जरी समृद्ध झालेले दिसत असले तरी, मानवतेची मूल्ये मात्र रसातळाला गेलेली आहे. याचे कारण म्हणजे शिक्षणामध्ये असलेला नैतिक मूल्यांचा अभाव होय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत मूल्य शिक्षणाला महत्त्व दिले आहे.
नुसते नको उच्च शिक्षण ।
ते गेले मागील युगी लपोन ।।
आता व्हावा कष्टिक बलवान ।
सुपूत्र भारताचा ।।
आज भारताला खरोखरच जीवन आणि शिक्षण यांचा मेळ साधणारी शिक्षण पध्दती हवी आहे. शिक्षण म्हणजे बौद्धिक विकास, ज्ञान संवर्धन, व्यावसायिक पात्रता होय. शिक्षण हे व्यक्तीमत्व विकासाचे एक महान साधन आहे. तसेच शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. महाराष्ट्रात ग्राम पातळीवर भजनाच्या माध्यमातून अखंडपणे लोक शिक्षणासाठी ज्यांच्या खंजेरीचा आवाज कडाडला आणि त्यातून त्यांची उद्बोधनाची तळमळ प्रभावीपणे जनमाणसांपर्यंत पोचली. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या विज्ञान युगातल्या विचाराची आणि पर्यायाने शिक्षणाची नाळ राष्ट्रसंताच्या वैचारिक प्रक्रियेशी जुळलेली आहे. गांव स्वयंपूर्ण बनून लोक उद्दमशील, निव्यर्सनी कसे होतील याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवले. जीवन शिक्षणही माणसाला शहाणं करतं पण अक्षर शिक्षण त्याची पहिली पायरी आहे. राष्ट्रसंत म्हणतात.
शिक्षण देऊन केली दिवाळी ।
अज्ञानाची करुनी होळी ।
तुकड्या म्हणे मन रंगलं ।
आता खोटंनाटं नाही राहिल ।
माझ गावच मंदिर शोभल ।।
म्हणजे आपण लाडू, पेढे, जिलेबी खाऊन, वाटून दिवाळी साजरी करतो, मात्र गावाला शिक्षण देऊन साजरी होते ती खरी दिवाळी होय. राष्ट्रसंत हे अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी संत होत. त्यांना स्वावलंबी व आचरण संपन्न करणारे शिक्षण अभिप्रेत आहे. त्यांचे मते शिक्षणातून व्यक्तीचा आत्मविश्वास वाढायला हवा, राष्ट्राचा विकास साधायला हवा. राष्ट्रसंतांच्या मते शिक्षण म्हणजे जीवनाच्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्याचे साधन होय. शिक्षणातून जीवन कौशल्याचा विकास व्हायला हवा. महाराज म्हणतात की, ग्रामोन्नतीचा पाया आहे. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी व आदर्श ग्रामाची निर्मिती करण्यासाठी जे शिक्षण हवे आहे ते शिक्षण देण्यात यावे. अशा शिक्षणाचे स्वप्न महाराजांनी पाहिले होते.
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा ।
जेथे कामी न ये बापाची संथा ।
बाप करी शेतीची व्यवस्था ।
मुलगा मागे नोकरी ।।
बापाची शिकवण मुलाच्या उपयोगी येत नाही, ते काय शिक्षण आहे? ही अजबच शिक्षणाची रीत आहे, बाप घरची शेती करतो व मुलगा नोकरीच्या शोधात फिरतो. मागील पिढीच्या खुळचट कल्पना विसरुन घरच्या मुलामुलींना शिक्षण द्यावे की, ज्याने गावाची सर्वतोपरी शोभा वाढेल. व्यावहारिक शिक्षण मुला-मुलींना प्रत्यक्ष दिले गेले पाहिजे.
मुलगी बहु शिकली शाळेमाझारी ।
परी स्वयंपाक करता न ये घरी ।।
काय करावी विद्या चतुरी? ।
कामाविण लंगडी ती ।।
बरेच जणांना स्वयंपाक न आल्याने जनावरासारखे जगण्याची पाळी येते. मुलगी शाळेत खूप शिकली पण घरी स्वयंपाक करता येत नसेल तर तिच्या शिक्षणाचे कौतुक कसे करावे? घरच्या कामाधामात ती निरुपयोगी ठरते. अशिक्षित मात्र प्रसंगी स्वतःचा स्वयंपाक करून पोट भरेल पण शिकलेला परक्याच्या मदतीवर अवलंबून राहणार. मुलास पंगतीत वाढता येत नाही, घरचे पाणी भरता येत नाही, तो ऐटीत राहत असेल तर त्याचे शिक्षण फुकट आहे असे राष्ट्रसंत म्हणतात.
याचसाठी शिक्षण घेणे ।
की जीवन जगता यावे सुंदरपणे ।।
दुबळेपण घेतले आंदणे ।
शिक्षण त्यासि म्हणो नये ।।
जीवन सुंदर जगता येईल , असे शिक्षण घेतले पाहिजेत. दुबळेपण मागे लावून घेणे याला शिक्षण म्हणता येत नाही. गावात जर गुंडाचा हल्ला झाला तर मुले घराच्या दारे, खिडक्या बंद करून आपला जीव वाचविण्याकरिता दारात कोंडून घेतात. असे शिक्षण कोणत्या कामाचे? म्हणून तर मुले शक्तीशाली, मल्लखांब खेळणारे, प्रतिकार करण्यास धावून जाणारे धाडसी बनले तरच ते शिक्षण उपयोगी म्हणावे.
गावासि कैसे आदर्श करावे ।
याचेचि शिक्षण प्रामुख्याने द्यावे ।।
सक्रियतेने करावयासि लावावे ।
विद्यार्जनी ।।
गावाला आदर्श करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र शिक्षणाची सुविधा गावातच निर्माण करावी. सहकार्याची प्रबळ भावना । हेचि शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा । असे सांगत असताना समाजाला व्यक्ती निष्ठते कडून समाज निष्ठतेकडे घेऊन जातात. समाजसेवा ही सर्व श्रेष्ठ भक्ती असल्याचे सांगून यातून राष्ट्रउन्नतीचे स्वप्न राष्ट्रसंत साकारताना दिसतात. समाजसेवेचे पहिले पाऊल सहकार्य असून, सहकार्य शिक्षणातून शिकविले जाते. उद्योगी मुले गावाचा उत्कर्ष केल्याशिवाय राहणार नाही. ती मुले गावाचे नाव मोठे करतील. मुलांना जीवन जगण्याचे शिक्षण द्यावे. असे जीवन शिक्षण द्यावे की, गावाचा गांवढळपणा जाऊन टिकाऊ परिवर्तनाचा मार्ग निश्चित सापडेल.
आदर्श होतील विद्यार्थी गण ।
गावाचे पालटेल जीवन ।।
कोठेच न उरेल गांवढळपणा ।
टिकाऊ परिवर्तन या मार्गे ।।
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....