वाशीम : जिल्हा कोषागाराच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येते की, कोषागारामार्फत निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच इतर अनुषंगीक लाभ प्रदान करण्यात येतात. हा लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे प्रदान करण्यात येणा-या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करुन संपर्क साधला जात नाही.तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सुचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो.
याबाबतच्या काही तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.कोषागार कार्यालयातील कर्मचा-यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही. सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणास दुरध्वनी,भ्रमणध्वनीवरुन उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन,गुगलपे,फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दुरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तीक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापुर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ व अप्पर कोषागार अधिकारी व्ही. रासेगांवकर यांनी केले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.