एखादी व्यक्ती जर बोलतांना चुकली तर त्याच्यावर शब्दांनीच अभिव्यक्त होऊन उत्तर देणे उचित असते. आपल्या याच संविधानिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचा या देशातील लोकांना विसर पडत चाललेला आहे.त्यामुळे चुकलेल्यांना योग्य सनदशीर मार्गाने आणि सद्भावी विचारांनी तथा सुसंस्कृत शब्दांनी योग्य ती समज देण्याचे दिवस आता भुतकाळात जमा झाले की काय असे आज वाटायला लागलेले आहे. चुकलेल्या व्यक्तीच्या अंगावर संतप्त होऊन धावून जाणे हे समर्थनिय नाही.तसेच उन्मादी अवसान आणून त्याचा उपमर्द करणे योग्य नाही. त्या उध्देशाने ईजा पोहचविणाऱ्या काही वस्तू भिरकावणे हे सुध्दा स्वत:ला सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणविणाराचे काम नाही.पातळी सोडून बेजबाबदारपणे केलेले कृत्य हे मानसिक विकृतीचेच दर्शन घडविणारे असते.त्यात संविधानिक जबाबदारी आणि कर्तव्य सांभाळणाऱ्या न्यायदानाच्या क्षेत्रातील कोण्या वकीलाने असे कृत्य करणे म्हणजे याला घसरलेले मानसिक संतुलन म्हणावे लागेल.कुणाच्या तरी उन्मादी आणि विषारी उपदेशाने त्याने केलेले हे भाडोत्री कृत्य असावे का? याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
परवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश आमचे विदर्भपूत्र मा.भुषण गवई यांचेवर एका वकीलाने पायातला बुट भिरकावण्याचा एक धर्मांध बिनडोकपणा घडवून आणला.तो विषय देशात गाजला.या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली संविधानिक जाण,न्यायव्यवस्थेचे भान आणि संवेदनशिलता काही परिपक्ल विचारांचे नेते,आणि सर्व सामान्न्य नागरीकांमध्ये दिसली.परंतू केन्द्र सरकार आणि भाजपच्या नेत्यांना त्याबध्दल काहीच वाटले असे दिसले नाही.मतलबासाठी चुकीच्या नेत्यांच्या आरत्या ओवाळणाऱ्या मिडीयालाही त्याची दखल घेण्याईतका तो विषय महत्वाचा वाटला नाही हे या लोकशाहीवादी देशाचे फार मोठे दुर्दैव आहे.पंतप्रधान मोदीजींनी सुध्दा खुप उशिरा भुषण गवईंना फोन केला अशी माहिती आहे.परंतू सरकारात बसलेले मंत्री,नेते मात्र साधा निषेध करण्यासाठी पण पुढे आले नाहीत.संविधान आणि लोकशाही विसरलेला मतलबी लोकांचा आणि भरकटलेल्या काही नेत्यांचा एक बिघडलेला देश अशी आपली प्रतिमा जगात हळू हळू निर्माण होत आहे. याचे वैषम्य किती राजकीय नेत्यांना आणि किती जबाबदार लोकांना आहे याचा विचार करण्याची खरी वेळ आज आलेली आहे. संविधानिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचं भान असलेलं परिपक्व विचारांचं एक समंजस व्यक्तिमत्व हा भुषण गवई यांचा या घटनेतून देशाला झालेला एक परिचय आहे. ते काही अक्कलशुण्य आणि दिशाहिन राजकीय नेत्यांप्रमाणे उथळ निश्चितच नाहीत.त्यामुळे या घटनेने ते विचलित न होता शांत असले तरी,केन्द्र सरकाने या घटनेची योग्य ती दखल घेतले पाहिजे. न्यायव्यवस्थेतील एका वकीलाने न्यायदानाच्याच मंदिरात घडविलेले कृत्य गंभीर आहे.तो संविधानिक संस्थेच्या प्रतिष्ठेला लागलेला धक्का आहे,त्याचा निषेध आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.सरकारने जर या प्रक्रियेला प्राधान्य दिले नाही,तर भविष्यात असे प्रकार अजून घडतील याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.
एखाद्या नेत्याला कोणी अपमानास्पद जरी बोललं तर सारं राज्य आणि देश यांच्याच बापाचा असल्यागत जनतेला वेठीस धरणारे मोर्चे काढून आंदोलनं केली जातात.मग तुमच्याच न्यायव्यवस्थेवर एखादा पोसलेला वकील सरन्यायाधिशाच्या दिशेने चक्क बुट फेकून मारतो? कशी झाली या विकृत माणसाची ही हिंमत? कुठून आला याला एवढा उन्माद? ह्या सर्व गोष्टी निश्चितच विचार करायला लावणाऱ्या आहेत.न्यायव्यवस्थेत सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर एक साधारण वकील सरळ हल्ला करतो.तरी देशाची मिडीया चिडीचूप,नेते झोपलेले आणि सरन्यायाधिशांची चुक दाखवत धर्मांध अधिक चवताळलेले या देशाने परवापासून पाहिले आहेत.सरन्यायाधिशपदावरील व्यक्ती ही समाजातील एक घटक आहे,माणूसच आहे. निकाल देतांना काही बोलले असतील आणि चूक झाली असेल.परंतू हा बुट फेकून मारणारा विक्षिप्त माणूस धर्माभिमान दाखवून स्वत:च्या कृत्त्याचं समर्थन करतो.धर्माचे मनुवादी ठेकेदार त्याची चुक सहजतेने घेत आहेत.भुषण गवई यांचेच वक्तव्य प्रकर्षाने अधोरेखित करणारे हे मतलबी आणि अमानुष धर्मांध गळे फाडून ओरडत आहेत.कुण्या सामान्न्य माणसावर सुध्दा अशाप्रकारे हल्ला करून त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणे हा गुन्हा आहे. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात घडविलेली घटना हा तर फार मोठा गुन्हा आहे.तो देशातील न्यायव्यवस्थेच्या अस्मितेचा प्रश्न आहे.त्याविरोधात सर्व जबाबदार नागरीकांनी पेटून उठलं पाहिजे.नाहीतर असे हे धर्मांध बिनडोक उठ सुठ कुठेही आक्रमक होऊन दडपशाहीने स्वत:चं मनमानी माफियाराज निर्माण करतील.ते येथील लोकशाही आणि संविधानाला लागलेले सर्वात मोठे ग्रहण ठरेल.
सरन्यायधिशांच्या मातोश्रींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाण्याचं नाकारणे आणि त्यानंतर ६ दिवसातच त्यांच्या सरन्यायाधिश मुलावर आघात होणे या घटनाक्रमाला निव्वळ योगायोग म्हणता येईल का याचा विचार आता झाला पाहिजे.देशाची न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांसाठी काम करते,न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे,संकटात आहे.असे भरपूर आरोप यापूर्वी झालेले आहेत.अनेक निकाल हे थक्क करणारे ठरलेले आहेत.न्यायमूर्ती भूषण गवई यांची वैचारीक बैठक वेगळी आहे.हा फरकच राजकीय नेत्यांना तापदायक आणि असुविधाजनक आहे.यापूर्वी जे अजब गजब निकाल लागल्याचे आरोप झालेत त्यावेळी याच न्यायव्यवस्थेतील हाच वकील कुठे गेला होता,झोपला होता का? त्यावेळी याचे बोलण्याचे धाडस का झाले नाही? या वकीलाच्या अनुचित कृतीला सहजतेने घेणाऱ्या मनुवाद्यांनी ते मागासवर्गिय आहेत म्हणून लवकर सरन्यायाधिश झालेत या गोष्टीला सुध्दा उजाळा दिला.या चर्चेतूनच या हल्ल्यामागे हिच मळमळ असावी,आणि याच अदृश्य शक्तींच्या उत्तेजनाने त्या वकीलाने हे धाडस केले असावे हेच या कडव्या चर्चेतून लक्षात येण्यासारखे आहे.
काही का असेना, ही देशात घडलेली एक गंभीर घटना आहे.ती कोण कोण ती गंभीरतेने घेते,आणि कैण कोण त्यावर बोलण्याचं टाळते यावरूनच त्यांच्या विचारांचा आणि मनोवृत्तींचा खरा तपास होणार आहे.हीच एक नार्को टेस्ट आहे.सरन्यायाधिश भूषण गवई हे तगाळातल्या सर्वसामान्न्यांमध्ये वावरलेल्या स्व.रा.सू.गवई या चळवळीतल्या नेत्यांचे सूपूत्र आहेत.न्यायव्यवस्थेची धुरा सांभाळतांना ते खंबीरच राहणार आहेत.त्यामुळे राजकीय नेत्यांच्या अडचणीचे एक सरन्यायाधिश वाटत असल्याने अशा प्रवृत्ती त्यांना ऐनकेन प्रकारे नामोहरम करण्याचे प्रयत्न करणार आहेत. सरकार त्यांना कशाप्रकारे साथ देते,यावरच न्यायालयीन कामकाजाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.परंतू हा विदर्भातला ताडोबाचा वाघ आहे हे अशा विध्वंसक मनोवृत्तीच्या विकृत प्रवृत्तीने सदैव लक्षात ठेवलं पाहिजे...!
संजय एम.देशमुख (निंबेकर) अकोला
ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....