गडचिरोली दि. 14 : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील दुब्बागुडा-दामरंचा रस्त्यामधील बांडीया नदीवर पूल व जोड रस्ता बांधकाम तसेच भाडभिडी-घोट-रेगडी-कसनसुर-गट्ट- कोठी-आरेवाडा-भामरागड ते राज्य सीमा रस्त्यावरील 5 लहान पुलाचे बांधकाम तसेच पिरमिली येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रच्या बांधकामाला जिल्हास्तरीय वनक्क समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मंजूरी दिली. यामुळे वनकायद्यामुळे प्रलंबित या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हास्तरी वनहक्क समितीची सभा काल श्री भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पूनम पाटे तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी 6 नवीन व अपील प्रकरणातील 1 वनहक्काचे दावे मंजूर करण्यात आले तर 2 नवीन व 7 अपील प्रकरणातील दावे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले. यासोबतच 46 वनहक्कधारकांच्या सुधारित वनहक्क पट्टे तयार करण्यास मान्यता देण्यात आली.
बैठकीत वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.