स्वत:च्या अघोरी अस्तित्वाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी व मानवता विसरून राजकारणातून अवैध माया जमविण्यासाठी, समाजविघातक प्रवृत्तींशी घरोबा करणाऱ्या अमानवीय वृत्तींचे थैमान महाराष्ट्र आणि देशातील राज्या राज्यामध्ये पसरत आहे.परंतू सामाजिकतेला तडा पोहचविण्यात सक्रिय असणाऱ्या या अनिष्ठ प्रवाहाच्या लाटा महाराष्ट्र आणि ईतर बिगर भाजप राज्यांच्या कीनाऱ्यांवरच जबर धडका देण्याचे प्रयत्न करीत आहेत.अशांततेला निमंत्रण देऊन कोरोनानंतर देशाच्या विकासाला आणखी विनाशाच्या खाईत घेऊन जाणारे सत्तांध राजकारण्यांनी निर्माण केलेले हे सैतानी चक्रीवादळ आहे.यामध्ये स्वप्ने दाखविणाऱ्या मोदींप्रमाणेच महाराष्ट्र विकासाच्या ब्ल्यू प्रिंटची मुर्ख बनविणारी आशा जागविणारे महाभागही सहभागी झाल्याने हे नेमके काय नवनित राज आहे, याबाबत देशामध्ये आणि महाराष्ट्राच्याही राजकारणात फार मोठी खळबळ माजलेली आहे.
"लाव रे तो व्हिडीओ" म्हणून जमणाऱ्या लाखोच्या गर्दीची किमया फक्त शेकडोंच्याच मतांमध्ये परावर्तित होऊ शकते हे खळखट्याककारांच्या लक्षात आले.मग स्वत:च्या अपयशाच्या चित्राला सकारात्मक यशाकडे घेऊन जाण्यासाठी काहीतरी नामी फॉर्म्युला पाहिजे हे सत्त्य उशिरा त्यांच्या लक्षाच आल्याने झालेला हा बदल असावा.परंतू महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत एक प्रभावी घराणं म्हणून ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या या परिवारातील माणसाने समाजाच्या शांततेला आणि आनंदाच्या मार्गाने होत असलेल्या विकासाला गालबोट लागू शकेल अशा उन्मादी विध्वंसक विचारांची पेरणी करून जनजीवन धोक्यात येणारे अमानविय विचार पेरावेत ही गोष्ट स्व.बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेलाही रूचणारी नाही.म्हणूनच राज ठाकरेंच्या कर्तृत्वाचा आणि वक्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगणारे मनसे पदाधिकारी या चुकीच्या समाजविघातक पावित्र्याला विरोध दर्शवून मनापासूनच मनसेला राम राम ठोकत आहेत.
"भिक नको पण कुत्रा आवर" म्हणत राज ठाकरेंना सोडचिठ्ठी देत आहेत.कारण संभाव्य जातिय दंगलींमध्ये स्वत:च्या मतलबी राजकारणासाठी नुसते घरातून आदेश देणाऱ्यांसाठी टाळकी फोडून घेऊन स्वत:सोबत कुटूंबाची आयुष्ये डावावर मांडण्याची चुकीची समाजविघातक कामे करण्यास पुढे येण्याची कोणाची तयारी नाही.आता काळ बदलला आहे,लोक सुज्ञ झाले आहेत. त्यांना फसविणाऱ्या लबाड राजकारण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याची निर्णयक्षमता ठेवण्याईतपत तयार झालेले आहेत.हे आता मानवता आणि लोकशाहिशी खेळू पाहणाऱ्या थापाड्या, धुर्त राजकारण्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.अशी कृत्त्ये करायला ज्या ज्यावेळी कोणी समोर येईल त्या त्यावेळी हा महाराष्ट्र आणि येथील शूर मावळे नुसत्या येथील चांडाळ चौकड्यांनाच नाही, तर देशातील समाजकंटकांचीही तोंडं काळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तेवढी क्षमता या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून येथील आघाडी सरकार अनेक मूहूर्त काढूनही टीकून आहे.आता ते जूनमध्ये कोसळविणार असा भोंगा नारायण राणे अकोला येथे वाजवून गेले आहेत.
प्रेताच्याही टाळूवरील लोणी खाणारे कुटील राजकारणी भोंगे सध्या सर्व महाराष्ट्र आणि देशभरात सर्वत्र कर्णकर्कश आवाजाने लोकांच्या मनस्वास्थ्याशी खेळत आहेत.भोंगे उतरवा असे न्यायालयाने म्हटलेले नसतांनाही ते न्यायालयाच्या निर्णयातील शब्दांची मोडतोड करून महाराष्ट्र पेटविण्याचे उपद्व्याप करीत आहेत.कट्टर धर्मांधता आणि जातिय तेढ निर्माण करून प्रेतांच्या ढिगावर नाचण्यात तांडवी आनंद व्यक्त करणे ही भाजप राजकारण्यांची विकृती आहे.कारण अच्छे दिनांची स्वप्ने दाखवत जनसामान्न्यांची लुट करीत त्यांच्या वेदनांमध्ये भर घालण्यापलिकडे कोणताच सेवाधर्म या महाठगांनी जोपासलेला नाही.विकासाची ब्ल्यू प्रिन्टही समुद्रात बुडविली असून या देशातील शेतकरी,छोटे उद्योजक,सुशिक्षित बेरोजगार,घाम गाळणाऱ्या श्रमिकांच्या जीवावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणे हाच यांचा एकमेव उद्योग आहे. या अमानवीय वृत्तींनी लोकशाही,संविधानावर आघात करीत स्वायत्त संस्थाही स्वत:च्या गुलामगीरीत जेरबंद केल्या आहेत.त्यांचा उन्मादी धयथयाट महाराष्ट्र,प.बंगाल आणि जिथे कुठे विरोधकांची सत्ता आहे तिथे सुरू आहे. ती सरकारे अस्थिर करून पाडण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी जातिय दंगली भडकविण्यास मदत करणाऱ्या वाह्यात सुपारीबाजांना पोसून त्यांना सर्वत्र भोंगे वाजविण्यासाठी सुरक्षा पूरवून वातावरण पोषक निर्माण करण्याचे षड्यंत्री कारनामे सुरू आहेत. ही कुटील रणनीति समाजस्वास्थ आणि विकासाचा लिलाव करणाऱ्या कुटील शकूनी मुखवट्यांनी सुरू केलेली आहे. बिनबोभाट बोंबलता यावे आणि अशांततेची परिसिमा गाठण्याईतके भोंगे वाजविता यावेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात फिरण्यासाठी खास सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचं कामही केन्द्रातल्या लबाड सत्ताधाऱ्यांनी हातात घेतलं आहे.
या ईडी,सिडी,सिबिआय,हनुमान चालिसा,अजान आणि भोंग्यांपेक्षा लोकांच्या जीवनमानाचे प्रश्न व वाढलेली महागाई हे प्रश्न या असंवेदनशील लोकांना महत्वाचे वाटत नाहीत.स्वत:च्या अघोरी महत्वाकांक्षेत अमर्याद अधिकार, सत्ता,आणि पापांच्या संपत्तीवर डोळा असणारांना महागाईच्या वणव्यात होरपळून बेचिराख होणारा सर्वसामान्न्य माणूस दिसत नाही.ज्यांचा या महाराष्ट्राने सार्थ अभिमान बाळगला,विश्वास टाकला तेही खाल्ल्या मिठाला जागणारे निघाले नाहीत, याचं फार मोठं धगधगतं वैषम्य आमच्या जनतेच्या हृदयात सारखं पेट घेत आहे. कारण येथे त्या मीठाला जागण्याईतक्या बांधिलकीचे दर्शन येथील माणसांऐवजी फक्त चार पायांच्या पशूमध्येच फक्त दिसते आहे.हा या मानवी समाजाचा रसातळाला नेणारा प्रचंड दैवदुर्विलास म्हणावा लागेल.म्हणूनच "माणसा माणसा, कधी होशील रे माणूस तू?" अशा आर्त वेदना शब्दांमधून ध्वनित करून येथील सदाचारी माणूस गेल्या काळातील सामाजिक संतांना, विधायक,सामाजिक विचारांच्या महापुरूषांना आठवतो आहे.सामाजिक सलोखा,बंधुत्व आणि मानवताधर्माचे संदेश देऊन निरोगी,आनंदी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजींना आणि समाजोध्दारक गाडगे बाबांना अंतरंगाच्या हितगुजातून आपल्या वेदना सांगतो आहे.कारण मर्यादापुरूषोत्तम, एक आदर्श प्रजादक्ष राजा, प्रभू रामचंद्राचे फक्त स्वार्थासाठी नाव घेऊन त्यांच्या आदर्शांचे अवमुल्यण करणाऱ्या चौकड्याच येथे सत्तेत सक्रिय आहेत,मग सांगणार कुणाला? "मूह मे राम बगल मे शुरी" या वाटचालीत रामाच्या अयोध्येत जाणारांची पात्रता काय, ते आता प्रभू रामचंद्रांनाच सिध्द करावी लागेल.३५ वर्षापूर्वी १९८४- ८५ च्या दरम्यान एका बंधूच्या प्रकाशित केलेल्या त्यावेळीच्या आमच्या "वृत्तसंजीवनी"मधील एका मुक्तछंद कवितेच्या ओळी आम्हाला आजही आठवतात...
धर्मगुरूंच्या संदेशांना चढते कसायांच्या सुऱ्याची धार
मानवता होऊनी हतबल येथे
होती तलवारीचे वार....! अशी परिस्थिती निर्माण करणारे समाजविघातक वाह्यात नेते आपल्याच समाजाने पोसून मोठे केले आहेत.त्यांना आता अटकाव केला पाहिजे...!
संपादक:- संजय एम.देशमुख,मोबा.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....