वाशिम : कला हेच जीवन मानून आपले आयुष्य समाजाच्या मनोरंजन आणि समाजप्रबोधना करीता वेचणाऱ्या कलाकाराच्या जीवनात वृद्धापकाळी भाकरीसाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली असून,गेल्या पाच वर्षात, पालकमंत्र्याकडून जिल्हा वृद्ध कलावंत मानधन निवड समिती स्थापन न झाल्याने,गेल्या सात आठ वर्षापासून,समाज कल्याण जिल्हा परिषदेकडे राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेच्या मानधना करीता प्रस्ताव दाखल केलेल्या,गरजू,निराधार,दिव्यांग, दुर्धर आजार ग्रस्त,वयोवृद्ध कलाकारांना वृद्धापकाळी उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे अखेर शासनाने,इसन 2023 मध्ये जिल्हाधिकारी यांना एका पत्रान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची जिल्हा निवड समिती स्थापन करून, वयोवृद्ध कलाकारांना मानधन मंजूर करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आदेशाने मार्च 2024 मध्ये जिल्हयातील पात्र वयोवृद्ध कलाकारांच्या निवडीसाठी कलावंताच्या कलेचे दि.04 मार्च ते दि. 10 मार्च 2024 पर्यंत सामाजिक न्याय भवन सभागृह नालंदानगर वाशिम येथे कलेचे प्रात्याक्षिक व सादरीकरण आणि लाभार्थीच्या कागद पत्रांची पडताळणी घेण्यात आली. परंतु अद्यापही इच्छुक लाभार्थी कलाकारांना मंजूरी देऊन प्रत्यक्षात मानधन मिळाले नाही. वास्तविक पहाता वयोवृद्ध तसेच दुर्धरग्रस्त कलाकारांना म्हातारपणाची शिदोरी म्हणून मानधन सुरू करणे हे अधिकाऱ्यांसाठी पुण्यकर्म असून, कलावंताच्या उदरनिर्वाहाची सोय झाल्यास त्यांचे आशिर्वाद अधिकारी यांना व त्यांच्या कुटुंबियाना मिळणार आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणाने गेल्या चार महिन्यापासून इच्छुक लाभार्थी कलावंताना ताटकळत ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ग्रामिण भागातील इच्छुक कलाकार वारंवार समाज कल्याण जिल्हा परिषद वाशिम कार्यालयात फेऱ्या मारून अक्षरशः कंटाळले आहेत. त्यामुळे अखेर विदर्भ लोककलावंत संघटनेने दि. 14 मार्च 2024 पासून,शेकडो कलावंताना सोबत घेऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे निदान आता तरी जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन,नविन लाभार्थ्यांना विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर मंजूरी द्यावी.अन्यथा जिल्ह्यातील सर्व लोककलावंत आणि रंगभूमी कलाकार आगामी विधानसभा निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी दिला आहे.