निवडणूका होण्याची वेळ आली किंवा निवडणूका जाहीर झाल्या की,विविध राजकिय पक्ष आणि नेत्यांना अगदी गावकुसातील,झोपडी पालांवरील मतदार दिसू लागतात. धार्मिकतेचा आव आणून ठिकठिकाणच्या देवस्थानांवर आणि फाटक्या कापडातील मतदारांसमोर ही मंडळी नतमस्तक होतात.आणि मग त्यांचे जनसंवाद यात्रा-मेळावे, रोगनिदान शिबीरे,गुणवंत विद्यार्थी सत्कार,गरीबांना मदत केन्द्रे, महिला मेळावे सुरु होतात. आपण किती दानशूर नेते आहोत ? याचा आव वेगळ्याच दिमाखात हे नेते मतदारांना पटवून देण्याचा केवीलवाणा प्रयत्न करतात.आणि एकदाच्या निवडणूका आटोपल्या म्हणजे "काम सरो वैद्य मरो." ह्या म्हणीला अनुसरून ह्या नेतेमंडळींना संसदेच्या किंवा विधानसभेच्या वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात असणार्या खुर्चीवर (राजसिहांसनावर) विराजमान करणाऱ्या खऱ्या किंगमेकर मतदार राजाला पार विसरून मोकळे होतात. निवडणूक काळात प्रत्येक मतदाराच्या गृहभेटी घेऊन त्यांना दोन्ही हात जोडणारे हे नेते निवडून आल्यावर मात्र व्हिआयपी होऊन मतदारांच्या किरकोळ प्रश्नाची उकल करण्यासाठी त्यांच्या किंगमेकरला टाळतांना दिसतात. तेव्हा मात्र किंगमेकर असलेल्या मतदारांवर पश्चाताप करण्याची वेळ येत असते. तेव्हा निदान यापुढे तरी नेत्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्या राजकिय पक्षांनी आपल्या खऱ्याखुर्या किंगमेकरला विसरू नये. असे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. कारण ही भोळी भाबळी मंडळी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या गावाच्या गावाच्या, समाजाच्या व त्यांच्या विकासाकरीता व मदतीकरीता आपल्याला मोठ्या विश्वासाने त्यांचे प्रतिनिधी म्हणून कारभार पाहण्यासाठी तुम्हाला सभागृहात पाठवीत असते. तुमचे भाग्यविधाते तुमचे खरेखुरे किंगमेकर हे ग्रामिण आणि शहरी भागातील झोपड्या आणि पालावर राहणारे आणि फाटक्या कपड्यात अर्धपोटी राहणारे मतदार असतात.याची मंत्री-संत्री-खासदार-आमदार-नगरसेवक-सरपंच यांना जाणीव असायला पाहीजे. व निवडणूकीपूर्वी तुम्ही ज्या परिस्थितीत मतदारांची गावांची, खेड्याची, त्यांच्या वस्त्याची त्यांच्या घरादाराची पायपिट करून त्यांना आर्त विनवणी करून मताचा जोगवा मागीतला त्याची आपल्या हृदयाच्या कोपर्यात सदैव जाण ठेवून ह्या तुमच्या किंगमेकर मतदारांच्या छोट्या मोठ्या किरकोळ गरजांची पूर्तता करण्यासाठी सदैव सेवाधारी म्हणून सेवारत राहीलं पाहीजे. तुमचा किंगमेकर असलेल्या गोरगरीब मतदार राजाच्या सेवेसाठी आणि त्यांच्या गावाच्या विकासासाठी अखंड तत्पर राहीलं पाहीजे. तरच खऱ्या अर्थाने तुमच्या राजकिय प्रवासात तुम्ही यशस्वी होऊन जीवनाचं सार्थक करू शकाल. कारण तुम्ही सदैव तुमच्या किंगमेकर मतदारांचे ऋणात असता. ही जाणीव जो नेता ठेवतो त्यालाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा किंवा प्रजासत्ताकचा अर्थ समजला असे म्हणावे लागेल.त्यामुळे जनप्रतिनिधींनो तुमच्या निवडीबद्दल आभारच मानायचे तर ह्या भोळ्याभाबळ्या मतदारांचे आभार मानले पाहीजे. *लेखक : संजय कडोळे, दिव्यांग समाजसेवक, कारंजा (लाड) जि. वाशिम.*