वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ठ कृषी बाजारपेठ म्हणून कारंजा शहराचा नावलौकीक संपूर्ण भारत देशात आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना सुद्धा संपूर्ण भारतात सर्वात अगोदर झाल्याचा इतिहास असून, येथील बाजारपेठ, भारतातील पहिली बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. तसेच कारंजा शहर हे अकोला - अमरावती - यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्याच्या केन्द्रस्थानी वसलेले असून येथील अडाण धरणामध्ये भारताच्या नकाशाचे विहंगम दृश्य बघायला मिळते. येथील शैक्षणीक संस्थानी डॉ . पंजाबराव देशमुखांसारखे कृषीमहर्षी, डॉ. विजय भटकरा सारखे संगणक संशोधक घडविल्याचा इतिहास असून कित्येक कायदेपंडीत, घडविल्याचेही दाखले असल्यामुळेच येथील शैक्षणीक संस्था ज्ञानार्जना करीता सुप्रसिद्ध असल्यामुळे सभोवतालच्या चारही जिल्हयातील विद्यार्थ्यांचा कारंजा शहराकडे ओढा असतो. कारंजा शहराला गुरुदत्त श्री नृसिह सरस्वती स्वामींची जन्मभूमी आणि जैन समाजाची काशी म्हणूनही ओळखल्या जाते. परंतु अशा सर्वगुणसंपन्न असलेल्या शहराचा औद्योगीक विकास मात्र स्वातंत्र्यानंतर होऊ शकला नाही. याची खंत वाटते. स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही काही काळ सुरु असलेला येथील कापूस उद्योग बंद पडला आहे. काही वर्षापूर्वी मंजूर झालेली औद्योगीक वसाहत येथे दुदैवाने उभी राहू शकली नाही. आणि त्यामुळे कोणतेच उद्योगधंदे येथे सुरु करता न आल्याने हे ऐतिहासिक व बाजारपेठेचे शहर दुदैवाने मागासल्या गेले असल्याची खंत असून येथील स्थानिक रहिवाशांच्या हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कारंजा शहराला कारंजा जन्मभूमि असलेला आमदार न मिळणे हे देखील या नगरीचे दुदैवच होय. बाहेरचे अनेक मंत्री, खासदार ,आमदार या नगरीतून निवडून गेलेत ? परंतु त्यांनी केव्हाही या शहराच्या विकासाकरीता, बेरोजगाराच्या रोजमजुरी उदरनिर्वाहा करीता कोणतीही विकासाची ठोस योजना येथे आणली नाही. याला कारणीभूतही स्थानिक राजकीय नेतेच आहेत. असेच म्हणावे लागेल. परंतु असो "झाले गेले गंगेला मिळाले." निदान यापुढे तरी कारंजा शहराच्या नागरीकांच्या जीवावर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीनी जाण ठेवावी. खासदार आमदार यांनी मंत्र्याशी समन्वय साधून, स्थानिक नागरीकाच्या मिठाला जागून औद्योगीक वसाहतीचे गठण करून, समृद्धी महामार्गाचा लाभ घेत, एखादा औद्योगीक प्रकल्प उभारून येथील नागरीकांच्या रोजगाराचा, मजूरीचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवावा.अशी मागणी, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.