वाशिम : पर्यावरणातील प्रदूषणामुळे संपूर्ण निसर्गचक्रच बदलले असून मार्च महिन्यातील वळवाच्या पाऊसाने नुकसान भोगलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा यंदा नववर्ष गुढीपाडव्या पूर्वी एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचा पूर्व अंदाज, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या रुई गोस्ता येथील, सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनिवरून संवाद करतांना सांगितले आहे. त्यांचे हवामान अंदाज खरे ठरत असल्यामुळे त्यांच्या अंदाजाची पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्या ग्रामस्थ शेतकऱ्याना प्रतिक्षा रहात असून त्यांच्या अंदाजाने शेकडो शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा मिळून आपल्या शेतमालाचे रक्षण करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. नुकतेचे हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी नव्याने दिलेल्या अंदाजानुसार दि 04 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज असून दि 06 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 पर्यंत पूर्व व पश्चिम विदर्भ, मराठवाडा,पूर्व-पश्चिम-उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलका तर बरेच ठिकाणी विजाच्या कडकडाटासह गारांच्या पावसासह मुसळधार पाऊस होण्याचा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह भयंकर उष्णता वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपल्या विदर्भ आणि महाराष्ट्र राज्यातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे रक्षण करावे. विजा,पाऊस सुरु असतांना शेतात, जंगलात थांबू नये. आपली जनावरे, शेळ्यामेंढ्या झाडाखाली थांबू देऊ नये असे आवाहन केले असल्याचे समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.