मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर येथे गाव संघटनेने विक्रेत्यांकडून पाच लिटर दारू पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दारू विक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली. तरीसुद्धा विक्रेत्यांनी न जुमानता सायंकाळच्या वेळी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. दरम्यान, गाव संघटनेने दारूविक्रीचा आढावा घेतला असता, एका घरी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गाव संघटनेच्या महिलांनी दारू विक्रेत्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारू जप्त केली व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.