वरोरा:-
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे यांच्यावर विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव सभेला उपस्थित न राहता सभागृहातून वॉक आऊट करून निघून गेल्याने अविश्वास ठराव बारगळला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या कार्यप्रणालीवर असमाधान व्यक्त करत 12 संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता.या अविश्वास ठरावावर आज ५ मार्च रोजी विशेष सभा घेण्यात आली होती. अविश्वास आणणाऱ्या बारा संचालकांपैकी पांडुरंग सोनबा झाडे ह्या संचालकाला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र असल्याने त्यांना दिलेली नोटीस रद्द ठरविली त्यामुळे विरोधकाकडे केवळ 11 च संचालक राहिले. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी 12 संचालकांची आवश्यकता होती. विरोधकांजवळ पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे ते आज अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आयोजित सभेला उपस्थित झाले व सह्या न करता सभा ८ दिवसानंतर घेण्यात यावी असे अध्याशी अधिकारी तहसीलदार योगेश कौटकर यांना अर्ज देऊन मागणी केली परंतु एकदा सभा ठरल्यावर सभा पुढे ढकलू शकत नाही व सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना असून त्यांची मागणी फेटाळली, त्यामुळे कोणताही विषयाला सामोरे न जाता सभागृहातुन निघून गेले. सभेत सत्तारूढ गटाचे तीन संचालक उपस्थित होते त्यांनी सुद्धा डॉ. देवतळे यांचे वर विश्वास असल्याचे लेखी पत्र दिले तशी नोंद कारवाई बुकात करण्यात आली. सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली व नियम २३ अ प्यारा ५ नुसार पुढील सहा महिने अविश्वास आणता येणार नाही असे नमूद करून अविश्वास फेटाळण्यात आला असल्याचे अध्याशी अधिकारी यांनी जाहीर केले.त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला असून देशोन्नती मधील बातमीतील भाकीत अखेर खरे ठरले.
या सभेला सत्तारूढ पक्षाचे तीन संचालक उपस्थित होते. मात्र अविश्वास प्रस्ताव आणणारे केवळ तीन ते चार संचालक सभागृहात आले व त्यांनी पिठासीन अधिकाऱ्याला सभेची मुदत व झाडे यांचेवरील कारवाई बाबत निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर ते उपस्थिती रजिस्टर वर स्वाक्षऱ्या न करताच निघून गेले. अविश्वास ठराव आणणाऱ्या पैकी एकही उपस्थित न राहिल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव बारगळल्याचे जाहीर केले.
सविस्तर असे की,वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे अविश्वास ठराव आणणाऱ्या संचालकात मापारी गटातून विजयी झालेले पांडुरंग सोनबाजी झाडे यांचा समावेश होता मापार्यांना 58 वर्षाची वयोमर्यादा असल्यामुळे त्यांचा २०२४ मध्ये परवाना रद्द झाला त्यांचे नुतनिकरण झाले नाही म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 27 मार्च 2024 च्या सभेत पांडुरंग झाडे हे संचालक राहू शकत नाही असा ठराव पारित झाला. हा ठराव समितीने जिल्हा उपनिबंधक कडे पाठविला. जिल्हा उपनिबंधकांनी या ठरावाला मान्यता दिली. त्यामुळे पांडुरंग झाडे यांचे संचालक पद आपोआप खारीज झाले.
पांडुरंग झाडे यांनी या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले. न्यायालयाने या निर्णयाला तात्पुरता स्थगनादेश दिला होता. या आदेशांवरील स्थगनादेश उठवत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९ जानेवारी 25 ला निकाल देत जिल्हा उपनिबंधकाचा आदेश कायम ठेवला व झाडे यांची याचिका फेटाळाली.
यानंतर पांडुरंग झाडे यांनी वरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे परवाना नूतनीकरणासाठी पून्हा अर्ज सादर केला परंतु मापार्याकडे एक वर्षापासून कोणताच परवाना नसल्याने परवान्याचे नूतनीकरण करता येत नाही असा नियम असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे पुन्हा अर्ज सादर केला. यावर परवानाच्या नूतनीकरणाबाबत न्यायालयाच्या आदेशापासून चार आठवड्यापर्यंत निर्णय घेण्यात यावा असा निर्णयरिट याचिका ६५२ अन्वये न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पांडुरंग झाडे यांनी समितीच्या कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पुन्हा अर्ज केला. मात्र त्यांचा अर्ज वयाची अट व उपविधी मध्ये ५८ वर्षावरील व्यक्तीला परवाना देण्यात येऊ नये असे नमूद असल्याने अनुज्ञप्ती समितीने अर्ज फेटाळून त्यांचा त्यांना परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे ते मागील चार ते पाच महिण्यापासून झाडे संचालक सभेत कार्यरत नाही आहे.संचालक नसतांना त्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली त्यामुळे त्यांना सभेची नोटीस देण्यात आली.बारा संचालकांना अविश्वास प्रस्ताव सादर केला असल्याने नियमाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांना तशा नोटीस पाठवले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी या 12 संचालकांपैकी पांडुरंग झाडे हे संचालक नसल्यामुळे त्यांची नोटीस रद्द करण्यात यावी अशा आशयाचे पत्र डॉ. देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकाकडून अहवाल मागितला. त्यावर सदर संचालक अपात्र असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 4 मार्च रोज मंगळवारला पांडुरंग झाडे हे अपात्र असल्याने त्यामुळे त्यांना दिलेली नोटीसही रद्द झाली.
त्यामुळे अविश्वास ठराव आणणाऱ्या संचालकांची संख्या 12 वरून 11 झाल्याने विरोधकांनी आज सभेला उपस्थित न राहता मतदाना पासून स्वतःला दूर ठेवले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांचे वरील अविश्वास ठराव अखेर बारगळला.
विरोधकांचे अध्याशी अधिकाऱ्यांना निवेदन
अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वी पांडुरंग झाडे यांना अपात्र ठरविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा असल्याने ही बैठक आठ दिवसानंतर पुन्हा बोलवण्यात यावी अशी मागणी करणारे एक निवेदन पिठासीन अधिकारी तहसीलदार योगेश कोटकर यांना काही विरोधकांनी दिले. मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी सदर मागणी करणारा अर्ज फेटाळला. त्यामुळे विरोधकांची संख्या 12 वरून अकरावर आली व सभापतीवरअविश्वास प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस चक्काचूर झाला.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव आणण्यात खासदारांचा प्रयत्न असल्याचा आरोप होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या आमदार करण देवतळे यांचे काका डॉ. विजय देवतळे व त्यांचे सहकारी सत्तारूढ असल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना सत्तेवरून खेचण्याचा खासदारा चा प्रयत्न मात्र फसला.
यापूर्वी शहराजवळील बोर्डा ग्रामपंचायत वर देखील अशाच प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला होता. चुकीच्या पद्धतीने दोन स्वायत्त संस्थांवर अविश्वास ठराव आणण्याचा सपाटा सुरु झाला असून खासदार महोदयांचा प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा संपूर्ण वरोरा तालुक्यात पसरली आहे.
अविश्वास बारगळणे म्हणजे सत्याचा विजय होय -डॉ. देवतळे
आज माझ्यावर आणलेला अविश्वासाचा ठराव विरोधकाजवळ संख्या अपुरी असल्याने फेटाळण्यात आला व माझा विश्वास ईश्वरावर असून निश्चितपणे आजचा अविश्वास बारगळणार हे मला माहित होते आणि यापूर्वीसुद्धा ईश्वर चिट्ठी सभापती म्हणून निवडून आलो होतो तसेच आज माझ्या आणलेला अविश्वास प्रस्ताव राजकीय सुढभावनेने आणला असून सर्व शेतकऱ्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद असल्यानेच हा अविश्वास फेटाळण्यात आला असून यात खरे श्रेय आमदार करण देवतळे व माझे सहा संचालक तसेच कार्यकर्यांना देत असून तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी असल्याचे सभापती डॉ.विजय देवतळे यांनी प्रतिनिधीला सांगितले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....