चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. नेरी जवळील खसारा बोडी (हेटी) जंगलात वाघाने केलेल्या गुराखी गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
गुराखी पतरु गरमळे (वय ५२) असे या गुराख्याचे नाव आहे.
या आठवड्यातील ही दुसरी घटना असून वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा आर्थिक मदत न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी शाह यांच्यावर लोकांनी रोष व्यक्त होत आहे.चिमूर तालुक्यातील कोटगाव येथील ५२ वर्षीय गुराखी पतरु गरमळे हा नेहमीप्रमाणे हेटीच्या मारुती जवळील शेतातील बैल चारण्यासाठी जंगलात नेले होते. दरम्यान यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला. सुदैवाने त्याने आरडाओरडा केल्याने वाघ पळून गेला. जखमी गुराख्याला प्रथम उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात येणार आहे.
ही आठवड्यातील दुसरी घटना असून यापूर्वी बोळधा येथील प्रकाश नाकाडे याच्यावरही वाघाने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेनंतर वनविभागाने कोणतीही प्रभावी कारवाई केली नाही किंवा जखमींना उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वनविभागावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा.जखमींना आर्थिक मदत आणि उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.अशा बेताल आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे बेताल वक्तव्य
घटनेनंतर जखमीच्या नातेवाईकांनी उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी शाह यांना थोड्याफार आर्थिक मदतीसाठी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी अत्यंत बेजबाबदार प्रतिक्रिया दिली. "आमचाही संसार आहे… आम्ही वाघाला म्हटले होते का हल्ला करा म्हणून… आम्हाला कोणते खर्च मिळते… आमचा पगार पुरेल का?" अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.