शिवसेना आमचीच असा दावा करत एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या ठाकरे आणि शिंदे गटांना निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाने मोठा धक्का दिला. आयोगाने शनिवारी रात्री तात्पुरता निर्णय जाहीर करत दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही गोठवले. तो निर्णय विधानसभेच्या एका जागेसाठी पुढील महिन्याच्या प्रारंभी होणाऱ्या पोटनिवडणुकीपुरता मर्यादित आहे. पण, त्या निर्णयामुळे तूर्त तरी शिवसेना कुणाचीच नसल्याचे चित्र समोर आले. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.