अकोला:- रा स्व संघाचे तृतीय सरसंघचालक प.पू श्री बाळासाहेब देवरस यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे आणि सरळ होते. सामान्यातील सामान्य स्वयंसेवकांशी सुध्दा संपर्क साधण्यामध्ये प.पू श्री बाळासाहेबांना अत्यंत समाधान आणि आनंदच वाटत असे.म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ सातत्याने होत गेली आणि तोच परिपाठी आजही सुरू आहे.आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झाली आहे. आपला स्वयंसेवक आपला स्वयंसेवक आजारी आहे आणि तो दवाखान्यात भरती आहे, असे कळल्यावर तर प.पू बाळासाहेबांना चैनच पडत नसे. कुणा स्वयंसेवकाची प्रकृती बरी नाही या कारणांमुळे ते सतत अस्वस्थ होत असत.कधी त्या स्वयंसेवकाला भेटतो आणि त्याची ख्यालीखुशाली ऐकतो इतकी कळकळ त्यांना वाटत असे.कारण स्वयंसेवक हा आपल्या परिवाराचा एक अविभाज्य घटक आहे. यादृष्टीनेच सर्व पातळीवरील कार्यकर्ते स्वयंसेवकाकडे पहात असतात.
असेच एकदा नागपूर येथील एक स्वयंसेवक श्री नारायणराव भाजीपाले हे अर्धांगवायूचा झटक्याने आजारी झालेत.श्री नारायणराव यांना एका दवाखान्यात भरती करण्यात आले होते.त्यांची प्रकृती तशी गंभीरच होती.श्री नारायणराव यांना दवाखान्यातील ज्या खोलीत ठेवले होते ती खोली प.पू श्री बाळासाहेब देवरस यांचे वडील कै तात्याजी देवरस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेली होती.त्या खोलीच्या दर्शनी भागावर एका संगमरवरी पाटीवर तसा उल्लेख सुध्दा होता.
श्री नारायणराव यांना त्या खोलीत घेऊन जात असतांनाच त्यांचे त्या पाटीकडे सहजच लक्ष गेले.अन् त्याच वेळी त्यांना प.पू.श्री बाळासाहेबांची आठवण झाली.आपली आणि प.पू श्री बाळासाहेबांची भेट व्हावी अशी श्री नारायणराव यांची इच्छा होती.आपली इच्छा त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या नातेवाईक आणि स्नेह मंडळी यांच्या जवळ व्यक्त केली. एवढेच नव्हे तर जवळपास पुढील तीन ते चार दिवस त्यांनी प.पू श्री बाळासाहेबांच्या भेटीसाठी तगादा लावला होता.प.पू श्री बाळासाहेबांचा कार्यक्रम अत्यंत व्यस्त असल्याने श्री नारायणराव यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी काहीतरी कारणे सांगून त्यांच्या या इच्छेकडे दुर्लक्ष करीत होते.परंतू श्री नारायणराव मात्र प.पू श्री बाळासाहेबांच्या भेटीसाठी अतिशय इच्छूक होते. काहीवेळा तर ते अत्यंत भाऊक होऊन जातं होते.
अशा परिस्थितीत श्री नारायणराव यांची भेटीची इच्छा प.पू.श्री बाळासाहेबां पर्यंत न पोहचविणे योग्य नाही असे वाटल्याने त्यांच्या काही मित्रांनी प.पू बाळासाहेबांपर्यंत त्यांची इच्छा पोहचवली.प.पू श्री बाळासाहेबांनी श्री नारायणराव यांच्या भावना लक्षात घेऊन तत्परतेने वेळात वेळ काढून भेट घेण्याचे ठरविले.तसे त्यांनी त्यांचे स्वीय सचिव ज्येष्ठ प्रचारक मा.श्री विष्णूपंत उपाख्य मामा मुठाळ यांना डायरीत नोंद करण्यास सांगीतले.
ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळी प.पू श्री बाळासाहेब श्री नारायणराव यांच्या भेटीसाठी दवाखान्यात गेलेत.त्यांनी श्री नारायणराव यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीबाबत संपूर्ण विचारपूस केली.तसेच त्यांचेवर सुरू असलेल्या उपचारांची नोंद असलेल्या औषधोपचाराची फाईल पाहिली.त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आणि त्यांचा निरोप घेतला.प.पू श्री बाळासाहेबांना पण श्री नारायणराव यांची भेट घेतल्याने बरे वाटले.
प.पू.श्री बाळासाहेबांच्या भेटीमुळे श्री नारायणराव यांना आपले संपूर्ण जीवनच कृतार्थ झाल्यासारखे वाटले." माझ्या जीवनाचे सार्थक झाले " असे भावपूर्ण उद्गार श्री नारायणराव यांचे तोंडून निघालेत.त्यानंतर जवळपास आठ दिवसांनी श्री नारायणराव यांनी जगाचा निरोप घेतला. जणू काही श्री नारायणराव हे प.पू श्री बाळासाहेबांच्या भेटीसाठीच आतुरलेले होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.
यावरून प.पू श्री बाळासाहेब यांच्याविषयी श्री नारायणराव यांना किती आत्मीयता होती हे दिसून येत असतांनाच प.पू बाळासाहेब हे सुद्धा आपल्या स्वयंसेवकांच्या भावनांचा किती आदर करीत असत तसेच संघ कार्या सोबतच त्यांच्या इच्छांना किती प्राधान्य देत असत याची सुध्दा प्रचिती येते.
आज ६ जूलै. प.पू बाळासाहेब यांचा तिथीनुसार स्मृतीदिन.त्यनिमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.- रवींद्र गोविंद पांडे ग्रंथालय भारती सक्षम भ्रमणध्वनी क्र ९३२५४५७०५२