गडचिरोली, १० जुलै : जिल्हा मुख्यालयातील कॉम्प्लेक्स परिसरात महिलेला वाचवितांना बसचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना चिरडल्याची घटना सोमवार १० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकींचा पूर्ण चेंदामेंदा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ९४ बीटी १६७६ क्रमांकाची बस गडचिरोली आगारातून चंद्रपूर कडे जात होती. दरम्यान कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या थोड्या पुढे आरसेटीच्या विरुद्ध दिशेला रस्त्यावर महिला आल्याने महिलेला वाचवितांना बसचालकाने बसवर नियंत्रण मिळविताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकींना चिरडले व बस थेट बॅरिगेट्स तोडून नाली पार करत फुटपाथ स्थळावर पोहचली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकी पूर्णतः चिरडल्याची यात दुचाकी मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दीही जमा झाली होती.