कारंजा : राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या विचारसरणीने प्रेरीत होऊन, आपले संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ किर्तन प्रवचन आदी समाजप्रबोधनाकरीता घालवीत, हजारो दारुडयांना व्यसनमुक्त करीत, त्यांचे सांसारीक जीवन सुखी करणार्या तसेच कारंजेकरांच्या गळ्यातील ताईत असणार्या, व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांच्या अपघाताची बातमी प्राप्त होताच, कारंजा येथील व्यसनमुक्ती प्रचारक संजय कडोळे, व्यसनमुक्ती प्रचारक दिलीपजी गिल्डा, डॉ. ज्ञानेश्वर गरड, नंदकिशोर कव्हळकर, रोमिल लाठीया,डॉ. इम्तियाज लुलानिया, उमेश अनासाने इत्यादी मंडळी काळजीत पडली होती. परंतु अखेर त्यांनी महाराजांशी संपर्क साधून त्यांच्या सुखरूप असण्याची वार्ता मिळताच समाधान व्यक्त करीत परमेश्वराचे आभार मानले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हभप मधुकर महाराज खाडे हे रामेश्वरम् येथून तिर्थाटन करून, नागपूर येथून आपले वाहन असलेल्या कार क्र. एम एच 29 वाय 1555 या गाडीने परत येत असतांना, यवतमाळ आर्वी राष्ट्रीय महामार्गावर अचानकपणे उड्डाणपुलावरील दुभाजकाला धडकून त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्या वाहनाने दोन तिन पलट्या घेतल्या. यावेळी त्यांच्या वाहनात त्यांच्या पत्नी बेबीबाई, मुलगा ओम, स्नुषा संजीवनी व नातवंडे आदी परिवार होता. परंतु क्षणभरात झालेल्या या अपघातातून गाडीच्या काचा फोडून इतरांची मदत मिळण्यापूर्वीच, खोडे महाराज स्वतः एकटे बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी कुटूंबाला बाहेर काढले. यावेळी सर्वजण सहीसलामत वाचले असून केवळ त्यांच्या पत्नी बेबीताई यांना खरचटलेले असून कमरेजवळ किरकोळ दुखापत झाल्याचे त्यांनी कळवीले आहे. त्यांचा सुखरूप समाचार कळाल्यामुळे कारंजेकरांनी समाधान व्यक्त केले असून, याविषयी अधिक बोलतांना संजय कडोळे म्हणाले, "सत्कर्म करीत समाजाची सेवा प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तीच्या सुखंदु:खात त्याच्या पाठीमागे परमेश्वर गुप्तपणे राहून त्याला संकटातून सहीसलामत वाचवीत असतो. हे या घटनेने सिध्द झाले आहे."