रेमंड कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबद्दल,शासनाकडून मार्ग काढण्याची खा.संजयभाऊ देशमुख यांची लोकसभेत आक्रमक मागणी.
*वाशिम* : वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील,यवतमाळमधील एकमेव मोठा असलेल्या रेमंड उद्योग कंपनीमध्ये १००० हून अधिक कामगारांनी दि. २१ जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनीसोबत ३१ मार्च २०२० रोजी झालेल्या कराराची मुदत संपली आहे.नियमानुसार दि ०१ एप्रिल २०२४ पासून नवीन करारामध्ये वेतनवाढ होणे आवश्यक होते,परंतु कंपनीकडून अद्याप झाली नाही.आधीच रोजगार नाही,त्यात जे काही कामगार आहेत त्यांना अतिशय कमी वेतनात कसे जगायचे ? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या कंपनीने कामगार युनियनला बाजूला ठेवून,स्वतःच्या मान्यताप्राप्त युनियनच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून वेतनवाढ न करता नवा करार सुद्धा केलेला नाही. एवढंच नाही तर ही युनियन कोणालाही विश्वासात न घेता पाच महिने आधी न्यायालयात केस दाखल करते.न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे कामगारांचे जीवनमार्ग थांबले आहेत, ते रोजच्या गरजा भागवायला असमर्थ झाले आहेत.
कंपनीने कराराचा कालावधी नियमानुसार तीन वर्षांचा न ठेवता चार वर्षांचा ठेवला आहे, जो अन्यायकारक आहे. याशिवाय,कामगारांवर वेगवेगळ्या कारणांवरून कारवाई करत,गेल्या दोन ते तीन वर्षांत हजारो कामगारांना निलंबीत केले आहे. त्यामुळे बरेच कामगार घरी बसवले गेले आहेत, त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच गेल्याने त्यांचा संसार धोक्यात आला आहे अशी परिस्थिती वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी सभागृहात मांडली.
तसेच यवतमाळसारख्या मागास जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय होत आहे. आणि सरकार गप्प आहे. म्हणून सरकारकडे आणि कामगार मंत्रालयाकडे नम्र विनंती केली की, यवतमाळमधील या आंदोलनाकडे तातडीने लक्ष द्यावे,कामगारांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करावी आणि रेमंड कंपनीला नवीन करार करण्यासाठी सक्त सूचना द्याव्यात.अशी मागणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर खासदार संजयभाऊ देशमुख यांनी सभागृहात लावून धरली आहे.