वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की, "जिच्या हाती पाळण्याची दोरी" म्हणजे आई ! तीच जगाचा उद्धार करु शकते. ती शंभर गुरुपेक्षाही महान आहे. आईची महती वर्णावी तेवढी कमी आहे. आईने जन्म दिलेलं प्रत्येक मूल हा तिच्या काळजाचा तुकडा जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असावा असे प्रत्येक आईला वाटत असते. त्यासाठी ती त्याला नित्य, सुंदर, सत्य संस्कार देत राहते. जर अगदी लहान वयातच त्या बाळावर आईकडून चांगले संस्कार झाले तरच ते बाळ जगाचे कल्याण करु शकते.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ।
तिच जगाते उद्धारी ।
ऐसी वर्णिली मातेची थोरी ।
शेकडो गुरुहुनिही ।।
या देवीचं नाव आहे सावित्री. केला अन्याय अत्याचाराचा प्रतिकार. शिकविला स्त्रियांना स्वाभिमान. विपरित काळात अडथळ्यांवर केली मात. सावित्रीने स्त्रियांचा उद्धार केला. स्त्री शिक्षणाचा केला प्रसार. स्वतः शिक्षण घेऊन केली सुरुवात. केली विधवा विवाहाची सुरुवात. घेतले दत्तक विधवा काशीबाईच्या मुलास. त्या यशवंतला डाॕक्टर केले. तो डाॕ.यशवंत होता नोकरीला सैन्यात. आशिया खंडात प्रथमच १ जानेवारी १८४८ ला सुरु केली मुलींची शाळा पुण्यात. सावित्री झाल्या शिक्षीका, मुख्याध्यापिका. स्वतः काढली अठरा शाळा महाराष्ट्रात. केली सत्यशोधक समाजाची सुरुवात. शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवियत्री, समाज सुधारक विविध मिळविल्या पदव्या समाजात.
सुरु झाली पुण्यात प्लेगची साथ. बोलाविले डाॕ. यशवंतला सैन्यातून परत. काढला सावित्रीबाई अन् डाॕ. यशवंतने दवाखाना पुण्यात. केली रात्रंदिवस माय-लेकांनी लहान मुले, आबालवृद्ध रुग्णांची सेवा. तंबूत राहून, हडपसर ससाणे मळ्यात. अर्पण केले सावित्रीबाईनी जीवन प्लेग रुग्णांच्या सेवेत. नव्हते स्ट्रेचर तेव्हा अस्तित्वात. लहान मुलांना चादरीत गुंडाळून खांद्यावर घेऊन धरली सावित्रीबाईंनी दवाखान्याची वाट. झाला देहांत प्लेगने १० मार्च १८९७ ला. झाल्या त्या सामाजिक शहीद पुण्यात. झाल्या अजरामर. सावित्रीबाईला या जगात मिळाला "क्रांती ज्योती" पुरस्कार. सावित्रीच्या प्रेरणेने आज स्त्रिया गाजवितात सर्व क्षेत्रे या जगात. पुणे विद्यापिठाला दिले आहे सावित्रीबाई फुलेंचे नाव. अशा या देवीला म्हणजेच सावित्रीबाई फुलेंना आमचा शतशः प्रणाम !
माँ जिजाऊः- आपला देश अनेक शूर मातांच्या गौरवगाथांचा साक्षीदार आहे. या शूरविरांपैकी एक देवी, एक माता जिजाबाई होय. वीरमाता जिजाबाई या छत्रपती शिवरायांच्या माता असण्या सोबतच त्याच्या मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत होत्या. आई प्रत्येक मुलांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा घटक असतो. योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचा फार मोठा वाटा होता. त्यांच्याकडून शिवाजी अनेक गोष्टी शिकू शकला म्हणूनच छत्रपती शिवाजींनी आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि आव्हानांना आपल्या धैयाने तोंड दिले. राजमाता जिजाबाई यांनी त्यांना तलवार बाजी, भाला चालविणे, युद्ध कौशल्य यासारखी कौशल्य शिकवली. काळानुसार आपल्याला देखील मुलांना काही गोष्टी शिकवणे गरजेचे असते. जिजाऊ मातेला त्यागाची देवी म्हटले जाते.
जिजाबाईला राजमाता जिजाबाई या नावानेही ओळखले जाते. लहान वयातच शहाजी राजे भोसले यांच्याशी तिचा विवाह झाला. जिजाऊ मातेंनी आठ मुलांना जन्म दिला. त्यापैकी सहा मुली आणि दोन मुले. अनेक कष्ट सहन करुन त्यांनी शिवाजीचे पालनपोषण केले. आई जिजाबाईंनी शिवाजीला एक महान योद्धा बनवण्यासाठी आपली स्त्री शक्ती वापरली. त्या लहानपणापासून शिवाजीला शूरविरांच्या कथा सांगायच्या. शिवरायांच्या जीवनाची दिशा ठरवण्यात त्यांचा सर्वाधिक प्रभाव होता. शहाजीचा मृत्यू झाल्यावर तिने सती जाण्याचा प्रयत्न केला पण शिवाजीने तिला तसे करण्यापासून रोखले. जिजाबाईंनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, जे मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरले. जिजाऊ मातेंनी शिवाजी महाराजांना रामायणातील, महाभारतातील गोष्टी सांगून घडवले. आई मुलाच्या या नात्यातून तुम्ही देखील अनेक गोष्टी शिकू शकता. श्रीराम यांनी जीवनात अनेक कठिण प्रसंगांना तोंड दिले आणि ते नेहमी त्यांच्या आदर्शावर ठाम राहिले. शिवाजी महाराजांनी जे बरोबर होते त्याचे समर्थन केले आहेत. चुकीच्या विरोधात उभे राहिले.
समाजाच्या प्रत्येक अंगात स्त्री शक्तीचा वास आहे. तीच नवदुर्गा आहे. प्रत्येकच जीव हा स्त्री तत्त्वाशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीने ठरविले तर जगाचे उत्थान होते. पुरुष एकटा काहीही करु शकत नाही. आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. स्त्रिला नुसते भोगवस्तू ज्यांनी समजले आणि नुसती कळसूत्री बाहुली बनवून ठेवले, त्या घरची स्त्री ही अबला ठरते. मग ती जगाचा उद्धार कशी करणार? स्वार्थाने घर बरबटलेल्या कुविचाराने माखलेल्या ह्या समाजाने सर्वप्रथम स्त्री जातीचा सन्मान करणे शिकले पाहिजे. मातेला मातेसमान, मुलीला मुलीसमान, बहिणीला बहिनीसमान आणि स्वतःच्या अर्धांगिनीला सहचारिणी समान वागणूक दिल्या गेली पाहिजे. तेव्हा समाज कुठेतरी विघटनापासून वाचू शकेल व समाज आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी सक्षम ठरेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
कीर्ती तोची स्वर्ग खरा ।
अपकिर्ती नरकाचा पसारा ।
याच जगी यांचा व्याप सारा ।
पाहती प्राणी ।।
बोधः- नवरात्री फक्त नऊ दिवसाची नसावी. समाजातली दुर्गा जपता यावी प्रत्येकाला आयुष्यभरासाठी. या नऊ दिवसात पायात चप्पल न घालणे, उपवास ठेवणे, पूजा करणे हे केले नाहीतरी चालेल, पण समाजातल्या प्रत्येक लक्ष्मीची, मुलींची इज्जत प्रत्येकाला राखता यावी कायमस्वरुपी. या नऊ दिवसात देवीच्या ओटीमध्ये काही नाही टाकता आलं तरीही चालेल, पण मित्रांना गमतीत शिव्या देत असताना त्या शिव्यांमधून प्रत्येकाला आई बहिणीला वगळता आलं पाहिजे. आपल्याला एवढे जरी जमलं तरी नवरात्री कायम साजरी केल्याचा आनंद होईल. माँ जिजाऊ कडून मुलांमुलीवर संस्कार कसे करायचे हे शिकले पाहिजे. सावित्रीने शिक्षण शिकण्याचा अधिकार दिला म्हणून स्त्री ही माणसाच्या खांद्याला खांद्या लावून प्रगती पथावर आहेत. खरेच या देवीला पुजायला हवे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात.
स्त्रियेसारखी मोहिनी नाही ।
स्त्रियेसारखी वैरागिनी नाही ।
स्त्रीयेसारखी मुलायम नाही ।
आणि कठोर रणचंडीका ।।
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....