वाशिम - तालुक्यातील मौजे राजगाव येथील राष्ट्रीय महामार्ग १६१ वर गतीरोधक नसल्यामुळे द्रुतगती वाहनाच्या वेगामुळे शाळकरी मुलेमुली व नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार निवेदने देवूनही प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे या महामार्गावर त्वरीत रबरी गतीरोधक बसविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने येत्या गुरुवार, १८ जुलै रोजी राजगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकर, जिल्हाध्यक्ष राजु किडसे वाहतुक सेना जिल्हाध्यक्षा गजानन वैरागडे यांच्या मार्गदर्शनात व वाशिम मंगरुळपीर विधानसभा जिल्हासंघटक गजानन कढणे यांच्या नेतृत्वात एनएचआय १६१ चे प्रमुख जवादे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, राष्ट्रीय राजगाव क्रमांक १६१ हा मार्ग तालुक्यातील मौजे राजगाव येथून गेला आहे. सदर मार्गावर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय असल्यामुळे या शाळेत जाण्यासाठी हजारो विद्यार्थी महामार्गाचा उपयोग करतात. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गतीरोधक नसल्यामुळे या मार्गावरुन भरधाव वेगाने वाहने नेली जातात. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या मालीका घडत असून दररोज अपघात होत आहेत. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याठिकाणी गतीरोधक बसविण्यासाठी शाळा प्रशासनाकडून विनंती अर्ज केल्यानंतरही गतीरोधक बसविण्यात आले नाही. त्यामुळे या गंभीर बाबीची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने दखल घेतली असून सदर मार्गावर त्वरीत गतीरोधक बसविण्यासाठी गुरुवार १८ जुलै रोजी राजगाव मार्गावर छत्रपती शिवाजी महाविद्यालयासमोर मनसे स्टाईलने रस्ता रोको आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना मनसेचे राज्य कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश फड, शहरप्रमुख रवि वानखेडे, वाहतूक सेना सहचिटणीस देविदास जैताडे, तालुकाध्यक्ष शुभम चिपडे, शहर उपाध्यक्ष अशोक इंगळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष बाळु विभुते आदी उपस्थित होते.