कारंजा (लाड):
"मरावे परी कीर्ती रुपी उरावे" या मराठी वाक्प्रचाराची प्रचिती कारंजेकरांनी लोकनेते स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या जयंतीनिमित्त प्रत्यक्षात अनुभवली. दि. १९ ऑगस्ट रोजी स्व.प्रकाश दादा डहाके यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त विविध सामाजिक संस्थेने अनेक उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांचा व प्रेमीजनांचा राबता,वर्दळ पाहता स्व.प्रकाश दादांकरीता नागरिकांच्या निस्सीम व निस्वार्थ प्रेमाची प्रचिती अनुभवता आली.
स्व.प्रकाशदादांचा स्वभाव हा स्पष्टवक्ता,रोखठोक व ठाम भूमिकेतून विचार मांडणारा व त्या विचारावर शेवटपर्यंत कायम राहणारा आपला माणूस, जवळपास शहरातील प्रत्येक कुटुंबियांशी थेट संपर्क होता. आपला माणूस म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली होती. त्यांनी कारंजा, मानोरा व परिसरातील नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आज रोजी कारंजा येथे दिमाखात, डौलदार स्थितीत उभे असलेले उपजिल्हा रुग्णालय,सर्वसामान्य जनतेकारिता दोन्ही उपविभागीय कार्यालये (महसूल, पोलीस), पर्यवारणाकडे लक्ष ठेऊन केलेले ऋषी तलावाचे संवर्धन व विकास, ऑक्सीजन पार्क वन पर्यटन केंद्राची निर्मिती इत्यादी प्रकारचे नानाविध विकास कामे स्वर्गीय दादांच्या कार्याची साक्ष जागृतपणे देत आहेत.
विशेष म्हणजे, काही राजकीय प्रस्थ स्वस्वार्थासाठी ज्या जमिनीवर डाव साधण्याचा प्रयत्न करत होते, तो डाव मोडीत काढून त्या जमिनीचे रक्षण करून दादांनी वन पर्यटन केंद्राची स्थापना केली. निव्वळ स्थापना करूनच ते थांबले नाहीत तर, या केंद्रासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि आज या उपक्रमामुळे कारंजा परिसरात शुद्ध हवा व पर्यावरणीय संतुलन टिकून आहे.
स्व. प्रकाश दादांनी समाजासाठी केलेले हे कार्य सदैव, निरंतर लक्षात राहील. त्यांचा श्वास जरी थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमातून आज अनेकांना शुद्ध श्वास घेता येत आहे, हीच त्यांची खरी जिवंत स्मृती आहे.
जयंतीनिमित्त सर्वप्रथम पूजन करण्यात आले त्यानंतर ऋषी तलाव वन पर्यटन केंद्र व स्व. प्रकाश दादा डहाके निसर्ग वन पर्यटन केंद्र या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सत्कार समारंभाचे
अध्यक्ष स्थानी सईताई डहाके, तर प्रमुख पाहुणे म्हणून
माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, शिक्षणाधिकारी माने साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे
संचालक नितीन नेमाने
प्रकाश लींगाटे, डॉ पारे
बाबु पाटील चौधरी,
विरेद्र चारथळ तसेच भाजपाचे राजीव काळे संजय लाहे निरंजन करडे विलास राठोड आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभ पार पाडणेकरिता खराटे सर ,चौधरी सर प्रविण कानकीरड सर यांनी परिश्रम घेतले.श्री गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालय, कारंजा व वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नसेवा रुजू करण्यात आली. या जयंतीनिमित्त दादाप्रेमी नागरिकांनी आदरांजली अर्पण करून स्व.दादा प्रती आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी आमदार सईताई डहाके, दत्तराजजी डहाके व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
समाजोपयोगी अद्वितीय व निरंतर स्मरणीय कार्याप्रती कारंजेकर व मानोरावासी नागरिकांनी अंतःकरणातून व्यक्त केलेली कृतज्ञता हीच स्व. प्रकाशदादा डहाके यांना खरी आदरांजली ठरली आहे.असे वृत्त ज्येष्ठ महाराष्ट्र शासन सन्मान प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांना मिळाल्याचे त्यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....