मारेगाव ते वणी राज्य महामार्गांवर असलेले खड्डे accident अपघातास कारणीभूत ठरत आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे गुरुवार, 24 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून दोन पुरुष किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.मारेगाव वणी रस्त्यावर गौराळा फाट्याजवळ 24 ऑगस्ट रोजी सुनिता नागेश खंडाळे (वय 30 वर्ष) रा. वरोरा जि. चंद्रपूर व त्यांचे पती हे वरोरा येथून आपल्या माहेरी वेगाव येथे येत असताना गोराळा बस स्टॉपपासून काही अंतरावर असलेल्या खड्यामध्ये त्यांची दुचाकी गेल्याने दोघेही दुचाकीसह पडले.
यात सुनीता गंभीर जखमी झाली. तिला प्रथम मारेगाव येथील जनहित कल्याण संघटनेने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु जखम गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तर लता विलास देऊळकर (वय 50 वर्ष) रा. गोंडबुरांडा व त्यांचे पती काही कामानिमित्त वणी येथे गेले होते. तेथील काम आटोपून मारेगावकडे येत असताना गौराळा जवळच महामार्गावर असलेल्या खड्यामुळे ते पडले. यात लता देऊळकर गंभीर जखमी झाल्या.
राज्य महामार्गावरील खड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कसे?
मारेगाव वणी हा राज्य महामार्ग आहे. या महामार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथे किरकोळ स्वरूपाचे अनेक अपघात घडतात. अपघात किरकोळ असल्याने याची कोणीही तक्रार करित नाही. परंतु या मार्गावर असलेले खड्डे बांधकाम विभागाला दिसत कसे नाही असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते. यातील काही खड्डे बुजवल्यासारखे दिसतात. पण अनेक खड्डे अजूनही तसेच असून हेच खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.