कारंजा :
माळी कर्मचारी सेवा मंडळ कारंजाच्या वतीने दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार दिनांक 18 ऑगस्टला स्थानिक महेश भवन येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती ब्रिगेडचे ऍड.नंदेश अंबाडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, जि.प.सदस्या सौं सुनिताताई कोठाडे,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाडे,पंचायत समिती सदस्य वसंतरावजी हळदे, विशाल घोडे,सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राहुल काळे,माळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, धनराज दिघडे, पंजाबराव फरकाडे, सुभाषराव मालपे आदी मान्यवर उपस्थित होते.संत सावता महाराज, महात्मा फुले,क्रा. सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण बोळे यांनी केले.यावेळी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र गौरव चिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी आपल्या मनोगतातून गेल्या 25 वर्षापासून भरीव कार्य करणार्या या मंडळाच्या वाटचालीबद्दल गौरव उद्गार काढले तसेच विद्यार्थ्यांनी समोर आलेल्या संकटावर मात करत जिद्दीने आणि अथक परिश्रमाने आपले ध्येय साकार करावे, थॉमस एडिसन हजार वेळा आपल्या प्रयोगात अपयशी झाला मात्र त्याने प्रयत्न सोडले नाहीत म्हणून तो जगविख्यात झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी श्रीकृष्ण बोळे, लीलाबाई उगले यांच्या पुढाकाराने आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दत्तक योजनेतून रोख रक्कम प्रदान करण्यात आली. यावेळी बारावीतील समीक्षा शेंदूरकर,कोमल मोहन जिचकार तसेच दहावीतील आरती नामदेव जेवळे, गौरी सुनील काळे व शिष्यवृत्ती परीक्षेत वाशीम जिल्ह्यातून प्रथम आलेली पूर्वी संतोष डहाके यांच्यासह इतर गुणवंत विद्यार्थी यांचा तसेच उद्योजक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अर्चना गोमासे यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग काठोळे यांनी माळी समाजातील प्रत्येकाने आपल्या ओबीसी आरक्षण हक्कासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ऍड.अंबाडकर म्हणाले की, घराघरातील संवाद नाहीसा होत आहे. संपूर्ण घर मोबाईलच्या नादात तल्लीन झाले आहे. अशावेळी पालकांनी अधून मधून आपल्या मुलांशी संवाद साधावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी क्रांतिज्योती ब्रिगेड या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रा. सुनील काळे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पापळे व अनुप डहाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल वैद्य यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मधुकरराव इंगळे, परमेश्वर व्यवहारे,योगेश्वर शामसुंदर,विवेक वासणकर, राजेंद्र शामसुंदर,सचिन महाजन, निलेश पेठकर,विजय भड, महेंद्र धनस्कर, शशिकांत वेळूकार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समाजबांधव,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....