शेगांव : संत गजाननन महाराज संस्थान हे आपल्या स्वच्छता, शिस्तबद्धता आणि पारदर्शी कारभाराकरीता संपूर्ण जगामध्ये जेवढे प्रसिद्ध आहे. तेवढेच मानवी सेवेच्या सेवाभावी कार्याकरीता देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे या संस्थान सारखी मानवता,निस्पृहता,निःस्वार्थ सेवाभाव संपूर्ण जगात केवळ याच संस्थानमध्ये बघायला मिळत असतो.जेव्हा जेव्हा देशावर किंवा समाजात एखादी आपात्कालीन संकटाची युद्धजन्य परिस्थिती,दुष्काळजन्य स्थिती,कोरोनासारखी भयंकर महामारी उद्भवली.त्या त्या वेळी संत गजानन महाराज संस्थान मानवसेवेसाठी तन-मन-धनाने मदतीसाठी स्वतःहून धाऊन गेल्याचा या संस्थानचा सुवर्णांकित इतिहास आहे.यावर्षी २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे.त्यामुळे संपुर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झालेले असून अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून राज्यातील पुरामुळे बाधीत झालेल्या पुरपिडीत शेतकऱ्यांसाठी शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाचे वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू. १ कोटी ११ लाखाचा सहयोग निधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांना दि. २७/०९/२०२५ रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थेने भरीव मदत देऊन सेवाकार्या सोबतच सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.ही वार्ता जेव्हा पूरपिडीत आणि शेतकऱ्यांच्या कानावर पडली असेल तेव्हा मात्र त्यांनी निश्चितच,अश्रूपूर्ण अंतःकरणाने श्री संत गजानन महाराजांना साष्टांग नमस्कार घातला असेल व हा परिस्थिती लवकरात लवकर दूर करण्याचे साकडे घातले असणार असे संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद कारंजाच्या सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे यांनी म्हटले आहे.