वरील मराठी म्हणीचा विचार केल्यास माणूस हा मळका असला तरी चालेल पण तो जळका असु नये असा अर्थ आहे. मळका म्हणजे त्याचे कपडे फाटके असू द्या की मळलेले असू द्या. आम्हाला चालेल, पण तो दुसऱ्याचे सुख पाहून जळत असेल तर चालणार नाही.
माझे मतानुसार माणूस हा मळका नसावा आणि तो जळका सुद्धा नसावा. माणसाच्या कपड्यावरुन काय देणे घेणे. फक्त माणसाचे गढूळ असलेले गलिच्छ मन साफ, पवित्र असायला हवे. उदाः- पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पौर्णिमेचा पूर्णचंद्र दिसतो. जर त्या पाण्याचे भांड्यात शेण कालविले तर आकाशातील चंद्र त्यामध्ये मुळीच दिसणार नाही. आपले विकाराने गलिच्छ बनलेले मन साफ केल्यानेच आत्मप्राप्ती होते. राष्ट्रसंत आपल्या भजनात म्हणतात.
दिल का मैल सफा कर लेना ।
सबने यही भजन बोला है ।।
आपल्याकडे गरीबी हा एक शाप समजले जाते. गरीब पैशांअभावी बऱ्याच गोष्टी पणाला लावतो. त्याला आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो म्हणूनच गरीब माणूस मळका असून तो दुःखी असतो. तो नेहमी आपलं दारिद्रय भोगत असतो. साहजिकच आहे, तो श्रीमंत, सुखी व्यक्तीचा विचार करुन जळत असेल. माझ्यापेक्षा श्रीमंत माणूस खूप सुखी व समाधानी आहे. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवावा लागेल आणि तोही चांगल्या मार्गाने बरं. आपण या जीवनात काहीही प्रगती केली नाही. आपली पैशांअभावी प्रगती होऊ शकली नाही.
माणूस हा समाजशिल प्राणी आहे. तो परिस्थितीचा गुलाम आहे. अशा या परिस्थितीतून बाहेर पडणे, मन स्थिर ठेवून परिस्थितीवर विजय मिळवणं या वाटतात तेवढ्या सहज आणि सोप्या गोष्टी नाहीत. कितीही काहीही केलं तरी माणसाच्या वाट्याला क्षणाक्षणाला दुःख येते आणि माणूस हा दररोज कणाकणाने जळत असतो. या परिस्थितीत अडकलेल्या माणसाचे मत दररोज आगीसारखे जळत असते. आपल्याला मळकही राहायचे नाही आणि जळकही राहायचे नाही. याचा विचार करुन आपण आपले कार्य करीत रहावे. "आपण भलं आपलं काम भलं" ही शिकवण आपल्यात उतरावयाची आहे. आपण आपले कार्य करताना निंदकांना घाबरु नका. त्यांना आपल्या विषयी जेवढे वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यापुढे आपले वर्तन सुधारुन जातं. समाजात मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं सोडू नका कारण ही दुनिया चांगल्या वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. माणसाने मळका ही असू नये आणि जळका ही असू नये. आपण राष्ट्रसंतांचे खालील भजन आपल्यात आत्मसात करु या.
तूने सेवाही न किया है ।
सुंदर दिखता है तो क्या है ।।
माणूस हा सुंदर दिसण्यासाठी नाही. तू सुंदर दिसून चालणार नाही, तुला समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करावी लागेल. दुःखी जनाचे दुःख दूर करावे लागेल. सेवा हाच धर्म जाणावा लागेल. आजकाल अशी परिस्थिती आहे की, दिवसातून चार वेळा कपडे बदलवितात आणि घडी घडी डोक्यात केसावरुन कंगवा फिरवितो आणि छाती काढून अकडल्या सारखा इकडं तिकडं फिरतोस, जसे म्हैस गवतावर चरतो तसा. तुझी जवानी चालण्या फिरण्यात जात असून देश, धर्माचे कार्य करण्यास प्रवृत्त व्हायला पाहिजे. तू छाती काढून फिरतोस तेव्हा एखाद्या चोर, मवाली वाटतोस. आता सुंदर दिसून चालणार नाही. देशासाठी सुभाषचंद्र बोस, गांधीजी, जवाहर तसेच बरेच क्रांती विरांनी आपले बलिदान दिले. हे त्यांचं कार्य फार सुंदर होतसं. झाशीची राणी इंग्रजासोबत लढली आणि तुम्ही काय करता? कॕरम, हाॕकी, क्रिकेट खेळता. याने खरचं भले होईल काय? वीर बना, देशासाठी बलिदान द्या. काहीतरी समाजासाठी कार्य करावे लागेल, त्यामुळे तुम्ही सुंदर दिसणार. आपला भारत देश तन, मन, धनासे सदा सुखी होवो, विजयी हो ! हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना सांगायचं आहे.
तन, मन, धनसे सदा सुखी हो !
भारत देश हमारा !!
विजयी हो, विजयी हो, विजयी हो !
भारत देश हमारा !!
लेखकः
पुरुषोत्तम बैसकार मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
आपल्या प्रतिक्रिया द्या....