कारंजा (लाड) : ग्रामीण भागातील कोळी या छोट्याशा गावखेड्यातून आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून स्वकष्टाने पुढे आलेले डॉ.ज्ञानेश्वर गरड हे आरोग्यसेवेसोबतच विविधांगी निःस्वार्थ समाज सेवेकरिता ओळखले जातात. गेल्या पंचवीस वर्षापासून ते सर्वधर्मिय विवाह सोहळे,रोगनिदान,रक्तदान,आरोग्य शिबीरे,व्यसनमुक्ती कार्य,विद्यार्थ्यांना गणवेशपाठ्यपुस्तकाची मदत व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करीत असतात.त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे दुर्धर आजारग्रस्तांना सर्वांगीन मदत करणे हे होय.शिवाय डॉ.ज्ञानेश्वर गरड हे हाडाचे कलावंत असून संगीतसम्राट म्हणूनही ओळखले जातात.अत्यंत प्रामाणिक,मनमिळाऊ,कार्यतत्पर,हजरजवाबी,सेवाभावी व विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ.ज्ञानेश्वर गरड हे धार्मिक वृत्तीचे असून शिवभक्त आहेत.त्यांना आध्यात्म्य व धार्मिक कार्यक्रमाची आवड असून शेलूवाडा,गायवळ इत्यादी शिवमंदिराचा जिर्णोध्दार त्यांच्या पुढाकाराने गावकरी बांधवानी करून घेतला आहे. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे ते परिसरात ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या कार्याची अनेक संस्थानी दखल घेतलेली आहे. शिवाय त्यांना यापूर्वी विविध पुरस्काराने विविध संस्थानी सन्मानित केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या ह्याच सेवाभावी कार्याची महती परस्पर,पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील जिद्द फाऊंडेशन कोल्हापूर आणि पाश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या दैनिक परतगंगा कोल्हापूर यांना कळाल्यामुळे,नुकतेच दि. 25 मे 2023 रोजी जिद्द फाऊंडेशन, कोल्हापूर आणि दैनिक परतगंगा कोल्हापूरच्या 14 व्या "राज्यस्तरिय पुरस्कार सोहळा 2023" मध्ये त्यांना कोल्हापूरी फेटा, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह,सन्मानपत्र देऊन, "राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने"सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजीत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड, आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तर भाग्यश्री पाटील, प्रा . श्वेता चौगुले, चित्रपट अभिनेते मदन पलंगे, दिलीप रेडेकर, सागर पाटील, योगेश पाटील, राहुल नलवडे, सविता अजित नाईक, बाजिराव नाईक, रविकिरण ईंगवले, संदिप पाटील, व्यवस्थापक मुरलिधर कांबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या अविस्मरणिय सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सुस्थ केसरकर हे होते. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन जिद्द फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ गीतांजली डोंबे आणि दैनिक परतगंगा चे संपादक सखाराम जाधव यांनी केले होते.यावेळी डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, "मी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत व्यतीत करण्याचा संकल्प घेऊन समाजसेवा करीत राहील." डॉ.ज्ञानेश्वर गरड यांना समाजरत्न राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्यामुळे वाशिम जिल्हा व कारंजा शहरातील कलाक्षेत्रातील त्यांच्या मित्रमंडळी मध्ये आनंद व नवचैतन्य संचारले असून त्यांचेवर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या प्रशंसनिय यशाबाबत, अमरावती विभागीय शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया,स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे,ईरो फिल्मस एन्टरटेन्टमेन्टचे डॉ इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया, जिव्हाळा परिवाराचे अतुल धाकतोड, अविष्कारचे अश्विन जगताप,अभा मराठी नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर,विजय खंडार इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....