तालुक्यातील भिसी शहरात झालेल्या दुहेरी घरफोडी प्रकरणाचा भिसी पोलिसांनी काही तासांत उलगडा करत अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू ठेवला आहे.
चिमूर तालुक्यातील भिसी शहरात ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुकानांवर झालेल्या घरफोडीने शहरात खळबळ उडाली होती. फिर्यादी राकेश विजय खोब्रागडे यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शनिवार पेठ, भिसी येथील दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून काउंटरमधील ७,३०० रुपये चोरी केले. त्याच वेळी शेजारील श्रीकांत सोहनलाल ठोंबरे यांच्या मालकीच्या "शरण्या इलेक्ट्रिकल्स" दुकानाचे सुद्धा लॉक तोडून, आत प्रवेश करत तीन नग टेबल फॅन (किंमत ७,५००) आणि रोख १,५०० असा एकूण १६,३०० चा मुद्देमाल चोरीला गेला.
गावातील काही नागरिकांनी रात्रीदरम्यान प्रज्वल उर्फ नागेश वामण तुबेकर याला संशयास्पदरीत्या भटकताना पाहिले. त्यास थांबवून विचारपूस करण्यात आली असता, त्याच वेळी पोलीस स्टेशन भिसीचे पेट्रोलिंग स्टाफ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने तसेच त्याचे साथीदार दीपक संजय छापेंकर आणि आयुष उर्फ गट्टू खोब्रागडे यांनी मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी क्रमांक २ दीपक छापेंकरला अटक केली, तर आरोपी क्रमांक ३ आयुष खोब्रागडे सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून शोधमोहीम सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरीचा मुद्देमाल प्राथमिक आरोग्य केंद्र, भिसी येथील युवराज खोब्रागडे या व्यक्तीच्या शासकीय निवासस्थानी लपविल्याचे उघड झाले. तसेच चोरीचा माल विकून मिळालेली रक्कम आरोपी क्रमांक १ ते ३ व युवराज खोब्रागडे यांनी परस्परात वाटून घेण्याचे ठरवले होते, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी युवराज खोब्रागडे याला ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत भिसी पोलिसांना चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून, अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.