
कमलादेवी भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सहभागी होऊ देण्यासाठी गांधींजीचे मन वळवले. सन १९२६मध्ये मद्रास विधानपरिषद निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीची संधी मिळाली. आयर्लंडच्या नेत्या मार्गारेट कमिन्स यांनी त्यांना उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिले. त्या ती निवडणूक कमी मतांच्या फरकाने हरल्या, परंतु त्यांनी महिलांच्या राजकीय पदांमधल्या भागीदारीचा मार्ग सुकर केला. त्या जर भारतीय इतिहासात आल्या नसत्या तर आज आपल्यासमोर देशाचे वेगळेच चित्र दिसले असते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महिलांनी सक्रिय सहभाग घेणे, पारंपरिक कलांना ऊर्जितावस्था आणणे यांसाठी प्रयत्न, लेखन, सामाजिक कार्य या आणि अशा विविध क्षेत्रांत कार्य केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. बराच वेळ विचार करूनही सुचत नाही, की कमलादेवींची थोडक्यात ओळख करून देताना नक्की कशाबद्दल सांगावे? त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल, त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्योत्तर सामाजिक कामांबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या सहभागाबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल, की हस्तकलेच्या त्यांच्या प्रेमाबद्दल, यापैकी नेमका विषय कोणता हाताळावा? प्रत्येक क्षेत्रातले त्यांचे योगदान आणि कार्य यांवर खरे तर एकेक दीर्घ लेख होऊ शकतो.
कमलादेवींचा जन्म दि.३ एप्रिल १९०३ रोजी कर्नाटकात झाला. मंगलोरला आपले शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी लंडनमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. पद्मश्री मणी महादेव यांच्याकडे त्यांनी संस्कृत नाट्यशास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्या बालविधवा झाल्या. पुढे हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. घरातील सुयोग्य वातावरण व सुसंस्कार यांमुळे देशाभिमान व राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले होते. स्वातंत्र्य चळवळीत महिलांना सहभाग घेता यावा, यासाठी त्यांनी गांधीजींची मनधरणी केली. त्याबरोबरच महिलांचे मूलभूत अधिकार आणि आर्थिक, धार्मिक, सामाजिक स्वातंत्र्य या विषयांचाही त्यांनी भरपूर पाठपुरावा केला. गांधीजींच्या असहकार चळवळीत आणि मीठाच्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या सत्याग्रहादरम्यान अटक झालेल्या त्या पहिल्या महिला होत. देशासाठी त्यांनी एकूण पाच वर्षे कारावास भोगला. त्याही आधी त्यांनी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सची स्थापना केली आणि सन १९२० साली म्हणजे जेव्हा भारतीय महिला मोकळेपणाने घराबाहेरही पडत नव्हत्या, त्या काळात एका सार्वजनिक निवडणुकीला उमेदवार म्हणून सामोऱ्या गेल्या. स्वातंत्र्य संग्रामातले त्यांचे अस्तित्व एखाद्या झंझावातासारखे होते. मुळातच लिखाणाची आवड असलेल्या कमलादेवींनी अनेक पुस्तकंही लिहिली. कामातल्या वैविध्याप्रमाणेच त्यांच्या लिखाणातही वैविध्य दिसून येते. दी अवेकिंग ऑफ इंडियन वूमन, जापान- इट्स वीकनेस अँड स्ट्रेंग्थ, अंकल सॅम एम्पायर, इन वॉर टॉर्न चायना, टुवर्डस् ए नॅशनल थिएटर ही त्यांची गाजलेली आणि चर्चिली गेलेली काही पुस्तके. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या कमलादेवींच्या कामाचे तळागाळात भरपूर कौतुक झालंच; पण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची योग्य दाखल घेण्यात आली. त्यांच्या या योगदानाची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. सन १९५५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. सामाजिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन १९६६ साली त्यांना आशियाचं नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन १९७४ साली संगीत नाटक अकादमीने लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्काराने त्यांना गौरविले. या व्यतिरिक्त फेलोशिप आणि रत्न सदस्य देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले. सन १९७७ साली युनेस्कोने त्यांच्या हस्तकला क्षेत्रातल्या कार्याचा गौरव केला. सन १९८७ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले. शांति निकेतनद्वारे देण्यात येणारा देसिकोट्टम या पुरस्काराच्याही त्या मानकरी आहेत.
कमलादेवींचे नाव सगळ्यात जास्त जोडले गेले, ते कला क्षेत्राशी. हथकरघा मां या जनमानसाकडून मिळालेल्या उपाधीवरूनच आपल्या हे लक्षात येते, की त्यांनी हातमागाचे संवर्धन आणि जतनासाठी भरपूर काम केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी हस्तकला आणि शिल्पकला हे कलाप्रकार वाचविण्यासाठी काम सुरू केले. हे कलाप्रकार त्यांच्या उपजत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जपले जावेत, त्यांची निर्मिती ही पूर्णपणे त्या कलाकाराच्या उत्स्फूर्त प्रतिभेचेच प्रतिबिंब असावे, यावर त्यांचा भर होता. बाजारातला उठाव व चलती या गोष्टींचा आपल्या या पारंपरिक हस्तकलांशी कुठलाही संबंध येऊ नये, म्हणून त्या प्रयत्नशील असत. उत्कृष्ट कला ही आपल्या परंपरेचे प्रतिनिधित्व करते आणि आपले मोल आपणच ठरवते, यावर त्यांचा विश्वास होता. भारताच्या विविध प्रांतांतील नानाविध हस्तकला त्यांनी शोधून काढल्या. प्रत्येक राज्यातली अनेक गावं पिंजून काढून त्यांनी हरतऱ्हेच्या हस्तकला, शिल्पकला आणि हातमागाच्या प्रकारांच्या नोंदी करून ठेवल्या. देशातल्या विणकर समाजासाठी तर त्यांनी इतके काम केले, की त्या जेथे जातील तेथील लोक त्यावेळी मानाचे प्रतीक समजली जाणारी आपली पगडी काढून त्यांच्या पायावर ठेवत असत. गावपातळीपर्यंत अस्तित्व असलेल्या हस्तकलांना राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम कमलादेवींनी केले. त्यांनी सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज एम्पोरियम आणि क्राफ्ट कौन्सिल ऑफ इंडिया या दोन संस्थांची स्थापना करून हस्त-शिल्प कारागिरांमध्ये सहकार चळवळ रुजवण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक कलांचं जतन करणाऱ्या या भारताच्या अनमोल ठेव्याचा आर्थिक, तसंच सामाजिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वेळोवेळी सरकारशी संघर्षही केला. आश्चर्य असं, की परकीय सरकारइतकाच स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारचाही विरोध त्यांना सहन करावा लागला. हस्तकला-शिल्पकलेपाठोपाठ भारताचे प्रमुख पारंपरिक कलाप्रकार म्हणजे नाटक आणि संगीत. या क्षेत्रांतही संवर्धन आणि जतनाबरोबरच व्यावसायिक शिक्षण आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीनं त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि संगीत नाटक अकादमीची स्थापना केली. कमलादेवींनी दि.२९ ऑक्टोबर १९८८ रोजी अखेरचा श्वास घेतला. सध्याच्या केंद्र सरकारने मार्च २०१७पासून महिला विणकर आणि शिल्पकारांसाठी "कमलादेवी चट्टोपाध्याय राष्ट्रीय पुरस्कार" देण्यास सुरुवात केली आहे. यापेक्षा मोठी पावती ती कोणती हवी!
!! युवाक्रांती परिवारातर्फे त्यांना व त्यांच्या कार्याला स्मृतिदिनी दंडवत प्रणाम !!
शब्दांकन व लेखक:-
निकोडे कृष्णकुमार गोविंदा, निवृत्त शिक्षक.
गडचिरोली, मधुभाष- ७७७५०४१०८६.
आपल्या प्रतिक्रिया द्या....