वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चार व अकोला मतदारसंघामध्ये दोन असे एकूण सहा नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. तसेच या चारही मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसात 472 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून आज बळवंत बसवंत वानखडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने चार नामनिर्देशनपत्र दाखल केले. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश यशवंत आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने एक व मुरलीधर लालसिंग पवार यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.
विभागातील अकोला आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 75 तर 30 मार्च रोजी 95 असे आतापर्यंत एकूण 170 नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 38 तर 30 मार्च रोजी 89 असे आतापर्यंत एकूण 127 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 44 तर 30 मार्च रोजी 40 असे आतापर्यंत एकूण 84 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 28 मार्च रोजी 67 तर 30 मार्च रोजी 24 असे आतापर्यंत एकूण 91 नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यात आले.
विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.