व्यसन ही एक महागडी स्थिती आहे. एखादी व्यक्ती सज्जनपणा दाखवितो आणि त्या आड तो दारु पितो. दारु पिणे याला भारतीय समाजात कधीही मान्यता नव्हती कारण दारु पिणे घोर पाप होते. पुरुषांच्या दारुच्या व्यसनाची सर्वात जास्त झळ, यातना स्त्रियांना भोगाव्या लागतात. दारुबाज हे जनतेत विश्वासपात्र मानले जात नाही. आज दारु पिऊन मरण्याएवढे आपले जीवन कवडीमोल झाले आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या प्रगतीला अनुकूल असतील अशीच माणसे जोडावीत. आपल्याला संगत कोणाची असते यावरून आपले चरित्र घडत असते.
गलेमें क्यो पहनी माला? ।
बदनपर भस्म चढा डाला ।
लगाया चंदन का टीला ।
पीता प्याला, प्याला शराबवाला ।।टेक।।
तुळशीची माळ ही वैष्णव (वारकरी) गळ्यात घालतात. हिंदू धर्मात तुळशीची माळ पवित्र मानली जाते. ज्यांनी तुळशीची माळ घातली असेल त्यांनी मासांहार, दारु पासून दूर रहावे लागते. तुळशी माळ मनाला शांत करते. तू तुळशी माळ घालून सुद्धा दारुचा प्याला पितोस हे योग्य नाही. भस्म लावणे नश्वरतेचे, वैराग्याचे, तपस्या, साधनेचे, अहंकार नाशाचे प्रतिक आहे. भस्म लावणे म्हणजे दुष्कृत्यांचा नाश करणे होय. भस्म मृत्यूचे स्मरण करुन देते. तू भस्म लावून साधू बनण्याचे ढोंग करतो आणि दारुचा प्याला पितोस. धार्मिक विधी, पुजा करताना कपाळावर चंदनाची पेस्ट, टिळा लावतात. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. हिंदू धर्मात चंदनाला पवित्र मानले जाते. तू सज्जनतेचे ढोंग करतो. तुळशी माळ, भस्म, चंदनाचा टिळा लावतोस आणि दारु काही केल्या सोडत नाही. तू तर दारुचा प्याला पिण्यास सरसावला आहे.
करता तीरथ जा-जाके, नहाता गंगामें बाके ।
दर्शन साधू-संतोके, करता सीर झुका करके ।
फिर भी अक्कल नही आयी, पीकर पडता है नाला ।
पीता प्याला, प्याला शराबवाला ।।१।।
तीर्थयात्रा केल्यामुळे मनशांती मिळते, ज्ञान वाढते, सकारात्मक ऊर्जा मिळते. मन शांत आणि प्रसन्न राहते. गंगेचे स्नान करणे पवित्र मानले जाते. "तन को धोया मगर, मन को धोया नही । फिर गंगा नहाने से क्या फायदा ।।" गंगा स्नान करुन दारुचे व्यसन तुझे सुटत नाही. दारुचा प्याला तुला हवाच. तीर्थामध्ये जाऊन साधू-संताच्या पायावर डोके टेकवतो. त्यांनी दिलेले ज्ञान, शिकवण का स्विकारीत नाही. संताचे दर्शन झाले तर माणूस सुधरतो म्हणतात. संताचा संग करुन सुद्धा तू दारुचा प्याला पितोस. "संत सांगती ते ऐकत नाही, दुर्जनाचे ऐकतो ।" तू आई वडिलांच्या जीवावर ऐश करतो आणि पैसे मागतो. तुला कधी शहानपण येईल. दारुचा प्याला पिऊन स्वतःवरील नियंत्रण गमावतो आणि घाणेरड्या नालीत जाऊन पडतोस. गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात. संत सांगतात ते ऐकत नाही आणि दारुचा प्याला पिऊन शरीराची खराबी करतोस.
जिसने शराब घर लाया, उसने घर ही उजडाया ।
किसने इन्सानी पाया? पिया तो जिंदगीसे खोया ।
तुझको किसने सिखाया है? घरका मुँह करने काला ।
पीता प्याला, प्याला शराबवाला ।।२।।
ज्या व्यक्तीने दारु घरात आणली त्या कुटूंबाच्या सर्व सुख-सुविधा आणि समृद्धीचा नाशच झाला आहे. घराला घरपण राहत नाही. दारु पिणाऱ्यामुळे कुटूंबाला दारिद्रय, दुःख आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कुटूंबाचे अस्तित्व धोक्यात येते. इंसानियत म्हणजे दया, सहानुभूती, करुणा, उदारता, माणुसकी, परोपकार होय. माणुसकी सोडून दारुच्या व्यसनामुळे, जास्त मद्यपान केल्यामुळे आपले जीवन तू वाया घालवत आहे. दारुच्या व्यसनामुळे कर्करोग, यकृतरोग, हृदयविकार होऊन जीवनाचे मोठे नुकसान होते. तुला कुणी सांगितले, घराचे तोंड काळे करायला. मुँह काला करणे म्हणजे कलंक लागणे, बदनामी होणे. ज्यामुळे व्यक्ती किंवा कुटूंब बदनामीला पात्र ठरते. एवढं सारं घडतं हे माहीत असताना सुद्धा तू दारुचा प्याला पितोस.
किसको तुझे फँसाना था, तेरा सब धन लुटाना था ।
तुझे दुनियामें मिटाना था, चारोंमे नाक कटाना था ।
इसी कारणसे छंद दिया, वारे तू भोला-भाला ।
पीता प्याला, प्याला शराबवाला ।।३।।
तुझा कोणाला जाळ्यात अडकवायचे होते? तुला तुझ्या धनाची लूट करायची होती काय? दारुमुळे तुझा सर्व खजिना खर्च होत आहे. तुला तुझे आयुष्य, अस्तित्व या दुनियेतून संपवायचे होते का? नाक कापणे म्हणजे नुकसान होणे, बेईज्जत होणे, बदनामी होणे. तुला कुणाची बदनामी, नुकसान करायचे होते का? फावल्या वेळात आनंद घेण्यासाठी माणूस जे काही करतो तो छंद होय. तुला तर दारुचा छंद जडला. तू दिसायला भोला-भाला वाटत होतास, साधा, सरळ, निष्पाप होतास. मित्राने तुझा भोला-भाला स्वभाव पाहून तुझा फायदा घेतला आणि तुला दारु प्यायला शिकविले. होणाऱ्या नुकसानीची तुला थोडीफार पर्वा नाहीस. दारुचा प्याला पोटात रिचवतोस.
तेरा घर नही था ऐसा, तमाशा तुने किया कैसा ।
गँवाया शराबमें पैसा, फिरता मुरदे जैसा ।
तुकड्यादास कहे सुनले, लगा दे व्यसनोंको ताला ।
पीता प्याला, प्याला शराबवाला ।।४।
तुझ्या आई वडिलांनी घराला स्वर्ग बनवले होते. तू दारु पिऊन घराचा तमाशा केलास. घरचा सर्व पैसा दारु पिण्यासाठी खर्च केला. आता तुझ्या शरीरात जीव नाही असा मुरद्यासारखा गल्लोगल्ली फिरतोस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे मी सांगतो ते ऐक. "ऐ मानव सुनले बात, व्यसनको छोड दे सारे ।" दारु पिणे सोडून व्यसनाला कुलूप लाव. सुसंस्कारीत, चरित्रवान, सामर्थ्यशाली समाज निर्माण करायला शिक. एवढं ज्ञान मिळत असलं तरी तू दारुचा प्याला घशात रिकामा करतो आणि घराची बरबादी करतोस.
लेखक;- पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....