वाशिम : नगर परिषद वाशिम अंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याकरीता नोंदणी करण्याचे आवाहन वाशिमचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी शहरातील लाभार्थ्यांना केले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना नव्याने सुरु केली आहे. त्यांच्या उत्पादनाची गुणवता व्याप्ती आणि पोहोच सुधारणे आणि त्यांचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बाजारपेठ मिळून देऊन त्यांची मूल्यसाखळी सोबत एकत्रित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या नोंदणीकरीता नगर परिषद, वाशिम व नोंदणीकृत कॉमन सर्विस सेंटर (सीएसएस) येथे करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांची खात्री झाल्यानंतर या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, टूलकिट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भता यासह सवलतीचे आणि तारण मुक्त कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.
नोंदणीकृत लाभार्थ्यांना पाच दिवसाचे मूलभूत कौशल्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत देऊन कर्ज सहाय्य, डिजिटल व्यवहारांसाठी नगर परिषद, वाशिम या ठिकाणी स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला आह. या योजनेच्या माहितीकरीता सहनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यालय अधीक्षक राहुल मारकड यांची नियुक्ती केली आहे. तरी वाशिम शहरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी विश्वकर्मा योजनेअंतर्गत नाव नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम यांनी केले आहे.